Home धर्म-समाज बोदवडमध्ये फराळ आणि किराणा साहित्याचे वाटप

बोदवडमध्ये फराळ आणि किराणा साहित्याचे वाटप

0
बोदवडमध्ये फराळ आणि किराणा साहित्याचे वाटप

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ‘जे का रंजले गांजले, तयासी म्हणे जो आपुले’ या संतमहंतांच्या आदर्शावर चालत मुक्ताईनगर येथील प.पू. गुरुवर्य संत रामभाऊ पुजारी बाबा सेवाभावी ट्रस्ट संचलित रामरोटी आश्रमाने सामाजिक बांधिलकी जपत आपल्या १९ वर्षांच्या अखंड सेवाकार्याची परंपरा यंदाही कायम राखली आहे. ‘मानव सेवा हीच ईश्वर सेवा’ हा विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवत आश्रमाच्या वतीने बोदवड येथील निराधार मनोरुग्णांना सांभाळणाऱ्या ‘आत्मसम्मान फाउंडेशन’मध्ये दिवाळीनिमित्त विशेष फराळ व संपूर्ण किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.
गेल्या ११ वर्षांपासून बोदवड येथील आत्मसम्मान फाउंडेशन हे संस्थात्मक जाणीवेतून निराधार मनोरुग्ण बांधवांचे संगोपन, वैद्यकीय उपचार आणि पुनर्वसन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहे. या वंचित आणि उपेक्षित बांधवांची दिवाळी आनंदाने साजरी व्हावी आणि त्यांच्याही आयुष्यात सुख-समृद्धीचा प्रकाश पडावा, या उदात्त हेतूने रामरोटी आश्रम परिवाराने हा विशेष उपक्रम आयोजित केला होता.
उपक्रमादरम्यान आश्रमातर्फे नमकीन चिवडा, सोनपापडी यांसारख्या स्वादिष्ट फराळासोबतच दैनंदिन अन्नधान्याची मोठी रसद पुरवण्यात आली. यामध्ये गहू, तांदूळ, साखर, तेल, तूप, रवा, मैदा, खोबरे, चहापत्ती, विविध डाळी, पोहे, मसाले, शेंगदाणे आणि सोयाबीन वडी या संपूर्ण किराणा साहित्याचा समावेश होता. याशिवाय दैनंदिन स्वच्छतेसाठी आणि उपयोगासाठी आवश्यक असणारे बिस्किटे, कपडे, आंघोळीचे साबण, निरमा पावडर आणि पॅराशूट तेल या वस्तूंचेही वाटप करण्यात आले.
हा भव्य सेवायज्ञ यशस्वी करण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी मोलाचे योगदान दिले. यामध्ये डॉ. एन. जी. मराठे, पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ व मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचा कर्मचारी वृंद, अजय प्रल्हाद खैरनार, पुरुषोत्तम वंजारी, हकिम आर. चौधरी, संदीप खरे, जगदीश निकम, डॉ. गणेश माधव येवले, प्रदीप चौधरी, अनिरुद्ध गोपाळ महाजन, मनोज भुजंगराव देशमुख, प्रदीप पुंडलिक निळे आणि सुनील नागोराव देशमुख यांचे सहकार्य लाभले. दानशूर व्यक्तींचे हे पाठबळ आणि रामरोटी आश्रमाच्या सेवकांची अथक मेहनत यामुळेच हा सामाजिक सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.