Home Cities जळगाव दिव्यांगांच्या हातून साकारला प्रकाशोत्सव! ११११ पणत्यांनी उजळले श्रीराम मंदिर

दिव्यांगांच्या हातून साकारला प्रकाशोत्सव! ११११ पणत्यांनी उजळले श्रीराम मंदिर

0
4

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यातील रुशिल मल्टिपर्पज फाऊंडेशन संचलित उडान दिव्यांग पुनर्वसन केंद्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी यंदाही आपली आगळीवेगळी आणि प्रेरणादायी दिवाळी साजरी केली आहे. शहरातील चिमुकले श्रीराम मंदिरात तब्बल ११११ दिवे प्रज्वलित करून भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला, ज्यामध्ये दिव्यांगांनी स्वतः सजवलेल्या पणत्यांनी संपूर्ण मंदिर परिसर उजळून निघाल्याचे दिसून आले.

रुशिल मल्टिपर्पज फाऊंडेशन संचलित उडान दिव्यांग पुनर्वसन केंद्रातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही हा विशेष दीपोत्सव आयोजित करण्यात आला होता. दिव्यांग विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी अत्यंत मन लावून विविधरंगी पणत्या सुशोभित केल्या होत्या. या कार्यक्रमाला आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी रोहन घुगे, मिहिका घुगे, जैन उद्योग समूहाचे प्रमुख अशोक जैन, ज्योती जैन, पोलीस अधीक्षक यांच्या पत्नी सानिका धिवरे, ह.भ.प. दादा महाराज जोशी, नगरसेवक अमित काळे, जैन उद्योग समूहाचे मीडिया संचालक अनिल जोशी, सुनील खैरनार, माजी नगरसेवक पांडुरंग (बंडू) काळे, परेश सनांसे आणि वैशाली सनांसे यांच्यासह अनेक मान्यवर प्रमुख उपस्थित होते.

यावेळी बोलताना मान्यवरांनी उडान दिव्यांग पुनर्वसन केंद्रातर्फे राबविण्यात येणारा हा उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचे गौरवोद्गार काढले. दिव्यांग मुलांनी स्वतःच्या मेहनतीने व कलाकुसरीने तयार केलेल्या या पणत्या आणि त्यांचा हा दीपोत्सव संपूर्ण समाजासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. उडान ही केवळ एक संस्था नसून दिव्यांगांना स्वबळावर उभे करण्याचा एक व्यापक विचार आहे. दिवाळीच्या आगमनापूर्वी हे दिव्यांग विद्यार्थी स्वतः ३ लाखांहून अधिक पणत्यांचे सुशोभिकर करतात, याद्वारे त्यांना हक्काचा रोजगारही उपलब्ध होतो. या दीपोत्सवाच्या माध्यमातून सर्वांच्या आयुष्यात सकारात्मतेचा प्रकाश पसरवा आणि समाजाचा दिव्यांगांकडे बघण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक व्हावा, हाच आमचा मुख्य उद्देश असल्याचे केंद्राच्या अध्यक्षा हर्षाली चौधरी यांनी स्पष्ट केले.

हा सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी उडानच्या अध्यक्षा हर्षाली चौधरी, प्रवीण चौधरी, हेतल पाटील, जयश्री पटेल, महेंद्र पाटील, कल्पना रोटे, प्रतिभा पाटील, रितेश पाटील आणि वनमाला कोळी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अक्षय नेहे यांनी केले.

Protected Content

Play sound