जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दिवाळी हा आनंद, उत्साह आणि आपुलकीचा सण असून या सणाचा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू कुटुंबांच्या चेहऱ्यावरही हास्य फुलावे, या उदात्त सामाजिक भावनेतून भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगरतर्फे एका विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. आमदार राजूमामा भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने दीक्षितवाडी परिसरातील तंट्या भिल्ल वस्तीमधील रहिवाशांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.
समाजातील वंचित व गरजू बांधवांसोबत दिवाळीचा आनंद द्विगुणीत करण्याच्या उद्देशाने भाजप महानगरतर्फे हा सामाजिक उपक्रम अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. शनिवार, ७ नोव्हेंबर रोजी एम.एस.ई.बी. ऑफिसच्या बाजूला असलेल्या तंट्या भिल्ल वस्तीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वस्तीतील नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत लोकप्रतिनिधींसोबत सण साजरा करताना मोठा आनंद व्यक्त केला.
या प्रसंगी आमदार राजूमामा भोळे, भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी आणि महापौर दीपमाला काळे यांच्यासह नगरसेविका उज्वला बेंडाळे, महिला मोर्चाच्या नितू परदेशी, रेखा वर्मा, पंकज जैन, रवी राजपूत आणि डॉ. विजय साखला यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. मान्यवरांच्या हस्ते स्थानिक रहिवाशांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.



