
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कै. सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूलमध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी उत्साहपूर्ण आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यांच्या सामाजिक कार्याचे स्मरण करत विद्यार्थ्यांना शिक्षण, समता आणि समाजप्रबोधनाचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एस. पी. निकम होते. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आणि पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक निकम यांनी महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.
महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाची दारे खुली करून समाजातील अज्ञान आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी मोलाचे कार्य केले. शिक्षणाच्या माध्यमातून समाजात परिवर्तन घडवून आणण्याचा त्यांचा विचार आजही महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांचे विचार आत्मसात करून शिक्षणाच्या माध्यमातून आपली प्रगती साधावी, असे मार्गदर्शन मुख्याध्यापक एस. पी. निकम यांनी केले.
या कार्यक्रमात शाळेतील सुशिल ढीवरे, लक्ष्मी इंगोले, नकुल हजारे, ज्ञानेश अढळकर, अनुष्का मौर्य, अक्षदा बोदडे आणि स्वामी पाटील या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांच्या कार्याविषयी विचार मांडून त्यांच्या योगदानाचे स्मरण केले. याप्रसंगी शाळेचे उपमुख्याध्यापक जे. एस. चौधरी, ज्येष्ठ शिक्षक के. टी. चौधरी, पल्लवी पाटील यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण पाटील यांनी केले, तर आशिष पाटील यांनी आभार मानले.



