
मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर शहरातील रविवारचा नियमित आठवडे बाजार उद्या, २९ नोव्हेंबर रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रोहन घुगे यांनी दिले आहेत. मतदान केंद्र परिसरात गर्दी, वाहतूक कोंडी आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच मतदान प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे रविवारच्या बाजारासाठी येणाऱ्या नागरिक, व्यापारी आणि विक्रेत्यांनी या निर्णयाची नोंद घ्यावी.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गृह शाखेने २८ नोव्हेंबर २०२६ रोजी यासंदर्भात आदेश जारी केला आहे. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सन २०२६ ते २०३१ या कालावधीसाठी संचालक मंडळाची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी मुक्ताईनगर येथील जिल्हा परिषद मराठी केंद्र शाळा, वॉर्ड क्रमांक १ येथे मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहे. रविवार, २९ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, याच दिवशी मुक्ताईनगर शहरात नियमित आठवडे बाजारही भरतो. बाजारासाठी शहरात नागरिक, व्यापारी आणि विक्रेत्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे मतदान केंद्राच्या परिसरात वाहतुकीची कोंडी होण्याची तसेच मतदान प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई मार्केट अँड फेअर्स अॅक्ट, १८६२ मधील कलम ५ (३) व ५ (क) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडावी, यासाठी बाजार बंद ठेवण्याची आवश्यकता आदेशात नमूद करण्यात आली आहे. दरम्यान, आठवडे बाजार बंद राहिल्यामुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी मुक्ताईनगर नगरपालिका प्रशासनाने पुढील सोयीस्कर दिवशी आठवडे बाजार भरविण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतला असून, मुक्ताईनगर शहरातील रविवारचा आठवडे बाजार २९ नोव्हेंबर रोजी भरणार नाही. त्यामुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांनी याची नोंद घेऊन त्यानुसार खरेदी-विक्रीचे नियोजन करावे.



