Home प्रशासन पोलीसांच्या विविध मागण्यांसाठी १० डिसेंबरला नागपूर विधानभवनावर पोलीस बॉईज असोसिएशनचा भव्य मोर्चा 

पोलीसांच्या विविध मागण्यांसाठी १० डिसेंबरला नागपूर विधानभवनावर पोलीस बॉईज असोसिएशनचा भव्य मोर्चा 

0
1


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ), होमगार्ड, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने गुरुवार, १० डिसेंबर २०२६ रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या माध्यमातून पोलीस कर्मचाऱ्यांचे आरोग्य, वेतन, पेन्शन, पदोन्नती, आरक्षण आणि कुटुंबीयांच्या कल्याणाशी संबंधित १२ प्रमुख मागण्या शासनासमोर मांडण्यात येणार असल्याची माहिती असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद तानाजी वाघमारे, जळगाव जिल्हाध्यक्ष भूषण नागरे आणि जिल्हा उपाध्यक्ष हेमंत तावडे यांनी दिली.

पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवेदरम्यान तसेच सेवानिवृत्तीनंतर भेडसावणाऱ्या विविध अडचणी सोडविण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना भेडसावणाऱ्या आरोग्यविषयक समस्या, पाल्यांच्या रोजगार व शिक्षणाच्या संधी, पेन्शनमधील अडचणी आणि सेवाशर्तींशी संबंधित प्रश्नांवर शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी असोसिएशनची मागणी आहे. असोसिएशनच्या प्रमुख मागण्यांमध्ये सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच त्यांच्या पत्नींना गंभीर आजारांवरील उपचारांसाठी महाराष्ट्रातील सर्व रुग्णालयांमध्ये सैन्यदलाप्रमाणे मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचा समावेश आहे. पोलीस भरतीमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना १० टक्के आरक्षण देण्यात यावे आणि या आरक्षणाचा लाभ सेवेत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाल्यांनाही मिळावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

गडचिरोली जिल्हा पोलीस विभागात कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दीडपट वेतन बंद करण्यात येऊ नये, यासाठी कायमस्वरूपी आदेश काढण्याची मागणी असोसिएशनने केली आहे. तसेच राज्य राखीव पोलीस दलात महिलांची भरती करून त्यांच्यासाठी स्वतंत्र बटालियन स्थापन करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील प्रत्येक कर्मचाऱ्याची दर दोन महिन्यांनी त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी म्हणजेच पोलीस ठाणे, मुख्यालय किंवा आयुक्तालयात संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात यावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे. होमगार्डच्या सेवेसंदर्भातील प्रश्नाकडेही या मोर्चातून लक्ष वेधण्यात येणार आहे. आंध्र प्रदेश, पंजाब, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील होमगार्डनाही कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यात यावे, अशी असोसिएशनची मागणी आहे. पोलीस उपनिरीक्षक (PSI) ते सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) तसेच पोलीस निरीक्षक (PI) पदोन्नतीसाठी पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे वाटप करण्यात आलेल्या संवर्गांतर्गत तीन संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.

पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना स्वतःचा उद्योग किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक व संस्थात्मक मदत मिळावी, यासाठी शहीद तुकाराम ओंबाळे यांच्या नावाने स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच २००५ नंतर पोलीस खात्यात भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणीही मोर्चात मांडली जाणार आहे. अनुकंपा नियुक्तीच्या नियमांबाबतही असोसिएशनने काही मागण्या पुढे केल्या आहेत. सन २००१ पूर्वीपासून पोलीस सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीसाठी त्यांच्या पाल्यांबाबत असलेली तीन अपत्यांची अट रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पोलीस सेवेत असताना निधन झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) या पदांवरील अधिकाऱ्यांच्या पाल्यांनाही अनुकंपा नियुक्तीचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

याशिवाय, पोलीस सेवेत असताना निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या विधवा पत्नींना मिळणाऱ्या पेन्शनमध्ये दहा वर्षांनंतर होणारी ४० टक्के वेतनकपात रद्द करण्याचा आदेश शासनाने मागे घ्यावा, अशी मागणी असोसिएशनने केली आहे. या सर्व मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन पोलीस कुटुंबांना न्याय द्यावा, अशी भूमिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली आहे. हा मोर्चा गुरुवार, १० डिसेंबर २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता नागपूर येथील यशवंत स्टेडियम, धंतोली येथून सुरू होऊन विधानभवनाकडे जाणार आहे. मोर्चाचे नेतृत्व पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद तानाजी वाघमारे करणार आहेत. जळगाव जिल्हाध्यक्ष भूषण नागरे आणि जिल्हा उपाध्यक्ष हेमंत तावडे हेही या आंदोलनात सहभागी होणार आहेत. या मोर्चात महाराष्ट्र पोलीस परिवार, होमगार्ड परिवार, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. मोर्चासाठी नागपूरला येताना किंवा प्रवासादरम्यान काही अडचण असल्यास जळगाव जिल्हाध्यक्ष भूषण नागरे यांच्याशी ९१७५९२६८६६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

 


Protected Content

Play sound