Home Cities जळगाव जळगाव महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळावर गैरव्यवस्थापनाचे आरोप ; खुर्चीला हार घालून...

जळगाव महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळावर गैरव्यवस्थापनाचे आरोप ; खुर्चीला हार घालून व्यक्त केला निषेध


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयातील कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पाचोरा येथील प्रा. गणेश झांजोटे यांनी प्रशासनाकडे तक्रार नोंदवली आहे. अधिकाऱ्यांची अनुपस्थिती, विलंबित कामकाज आणि सामान्य नागरिकांना होणारा त्रास यामुळे संतप्त होत त्यांनी शासनाकडे कारवाईची मागणी केली आहे. तसेच त्यांनी जिल्हा व्यवस्थापक यांच्या खुर्चीला हार घालून निषेध व्यक्त केला.

प्रा. गणेश झांजोटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते आज ४ मे २०२६ रोजी जळगाव समाजकल्याण विभागाच्या अंतर्गत असलेल्या महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयात गेले असता, तेथील जिल्हा व्यवस्थापक काशिनाथ झोपळे नियमितपणे कार्यालयात उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले. ते आठवड्यातून केवळ दोन दिवस कार्यालयात येतात आणि तेही दुपारी उशिरा येऊन अल्पावधीतच निघून जातात, असा आरोप त्यांनी केला आहे.

या परिस्थितीमुळे दूरवरून येणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचेही त्यांनी नमूद केले. उन्हाच्या तीव्रतेत अनेक नागरिक आपल्या कामासाठी कार्यालयात येतात, मात्र अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे त्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागते. कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून ‘साहेब उपस्थित नाहीत’ असे उत्तर मिळत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.

प्रा. झांजोटे यांनी स्वतःचा अनुभव सांगताना नमूद केले की, त्यांनी आपल्या मुलांच्या वैद्यकीय शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज मिळावे यासाठी गेल्या तीन वर्षांपासून फाईल सादर केली आहे. मात्र आजपर्यंत त्यांच्या दोन्ही मुलांना कर्ज मिळालेले नाही. या विलंबामुळे त्यांच्या कुटुंबावर आर्थिक ताण वाढल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ हे अनुसूचित जातीतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी स्थापन करण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात या संस्थेच्या कार्यपद्धतीमुळे गरजू नागरिकांना अपेक्षित लाभ मिळत नसल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. शासनाकडून या संस्थेवर मोठ्या प्रमाणावर खर्च केला जात असताना, प्रत्यक्ष लाभार्थ्यांना न्याय मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.


Protected Content

Play sound