अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तहसील कार्यालयातील कथित लाचप्रकरणानंतर केवळ दोन व्यक्तींवर कारवाई होऊन मुख्य सूत्रधारावर कारवाई का होत नाही, असा सवाल उपस्थित करत क्रांतिकारी शेतकरी संघटनेने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये संताप व्यक्त होत असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सोनगीर (ता. धुळे) येथून पाठविण्यात आलेल्या या निवेदनात अमळनेर तहसील कार्यालयात तहसीलदारांच्या नावाने लाच मागितल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई करत दोन व्यक्तींना अटक केली असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, या कारवाईनंतरही संबंधित तहसीलदारांविरोधात कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, अमळनेर तालुक्यात शेतकऱ्यांशी संबंधित अनेक महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत. नैसर्गिक आपत्ती अनुदान, पीकविमा, फार्मर आयडी तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेशी संबंधित अडचणींमुळे शेतकरी त्रस्त आहेत. याशिवाय रेती माफिया आणि गौण खनिज व्यवसायाला राजाश्रय मिळत असल्याचेही आरोप करण्यात आले आहेत, ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागावरील जनतेचा विश्वास डगमळीत होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये केवळ खालच्या स्तरावर कारवाई होत असून, मुख्य जबाबदार व्यक्तींवर कारवाई होत नसल्याने प्रशासनाविषयी नाराजी वाढत असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ईश्वर उखा पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून अमळनेर तालुक्यातील जनतेला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे. तसेच शासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.



