Home Cities जळगाव “मनपा अधिकाऱ्यांनी गुलामासारखे वागू नये”; जळगावात बॅनर परवानगी रद्द प्रकरणावर गजानन मालपुरेंचा...

“मनपा अधिकाऱ्यांनी गुलामासारखे वागू नये”; जळगावात बॅनर परवानगी रद्द प्रकरणावर गजानन मालपुरेंचा संताप


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिकेकडून जाहिरात फलकाची परवानगी रद्द करण्यात आल्याच्या प्रकरणावरून शहरात राजकीय आणि प्रशासकीय वादाला तोंड फुटले आहे. या पार्श्वभूमीवर गजानन मालपुरे यांनी मनपा अधिकाऱ्यांवर टीका करत “अधिकाऱ्यांनी गुलामासारखे वागू नये” असा स्पष्ट सल्ला दिला आहे.

गजानन मालपुरे यांनी सांगितले की, शहरातील भूखंड व्यवहारांबाबत काही ठेकेदारांकडून गैरप्रकार होत असल्याचा आरोप करत त्यांनी स्वातंत्र्य चौकात आमदारांना उद्देशून खुले पत्र लावण्यासाठी विधिवत परवानगी घेतली होती. मात्र, ही परवानगी रात्री उशिरा ११.३६ वाजता रद्द करण्यात आल्याचे त्यांना कळविण्यात आले, असा आरोप त्यांनी केला आहे. या निर्णयामागे दबाव असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, महानगरपालिकेच्या म्हणण्यानुसार, संबंधित बॅनरवरील मजकुरात जळगाव शहराच्या आमदारांविषयी वैयक्तिक स्वरूपाची टिप्पणी आढळून आली होती. त्यामुळे परवाना नियम व अटी क्रमांक ६ चे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले. या नियमानुसार कोणताही आक्षेपार्ह किंवा अनधिकृत मजकूर जाहिरात फलकावर प्रदर्शित करण्यास मनाई आहे.

महानगरपालिकेने स्पष्ट केले की, परवानगी देताना मजकूर तपासणीदरम्यान काही तफावत राहिली होती, मात्र नंतर आढळलेल्या आक्षेपार्ह मजकुरामुळे परवानगी तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात आली. यासोबतच संबंधित बॅनर तातडीने हटवण्याचे आदेश देण्यात आले आहे.

उपायुक्त पंकज गोसावी यांनी सांगितले की, शहरातील जाहिरात फलकांसाठी ठरवलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे शहरात बॅनरबाजीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न दिसून येत आहे.


Protected Content

Play sound