चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील गलंगी येथे दुचाकीवरून अवैधरित्या गांजाची वाहतूक करणाऱ्या एका तरुणावर चोपडा ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी दीड लाख रुपये किमतीचा साडेसहा किलो ओला गांजा आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी इनेश रेगड्या पावरा (वय ३५, रा. बेलाने, ता. चोपडा) हा गलंगी गावातून आपल्या दुचाकीवरून अवैधरित्या गांजाची वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना मिळाली होती. माहिती मिळताच, त्यांनी तातडीने पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
या सूचनांनुसार, पोलीस पथकाने बुधवार, २१ मे रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सापळा रचून कारवाई केली. संशयित आरोपी इनेश रेगड्या पावरा याला ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याजवळ दीड लाख रुपये किमतीचा साडेसहा किलो ओला गांजा आढळून आला. पोलिसांनी हा सर्व गांजा तात्काळ जप्त केला. तसेच, गांजा वाहतुकीसाठी वापरलेली त्याची दुचाकीही जप्त करण्यात आली आहे.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गजानन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी इनेश रेगड्या पावरा याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे करीत आहेत. अवैध गांजा वाहतुकीवर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.