कौटुंबिक वादातून विवाहितेला मारहाण करत छळ


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील न्यू एरिया वॉर्ड परिसरात माहेर असलेल्या एका विवाहितेचा नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील सासरी शिवीगाळ आणि मारहाण करून छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात बुधवार भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विद्या निलेश पगारे (वय ३०) असे पीडित विवाहितेचे नाव आहे. भुसावळच्या न्यू एरिया वॉर्ड येथे त्यांचे माहेर असून, त्यांचा विवाह २०१८ मध्ये नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील निलेश नामदेव पगारे यांच्यासोबत रितीरिवाजानुसार झाला होता. मात्र, लग्नानंतर काही दिवसांपासूनच विद्या यांचा छळ सुरू झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

लग्नाच्या वेळी मानपान मिळाले नाही, असे टोमणे मारून त्यांना शिवीगाळ करण्यात आली. तसेच, पती निलेशने विद्या यांना चपटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आणि त्यानंतर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. हा छळ असह्य झाल्याने विद्या आपल्या माहेरी भुसावळ येथे परत आल्या.

माहेरी आल्यानंतर त्यांनी बुधवारी २१ मे रोजी रात्री ९ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीनुसार, पती निलेश नामदेव पगारे, सासू विजयाबाई नामदेव पगारे, सासरे नामदेव भिकाजी पगारे, जेठ जीवन नामदेव पगारे आणि जेठाणी सविता जीवन पगारे (सर्व रा. निफाड, जि. नाशिक) यांच्याविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत देशमुख करीत आहेत.