जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील भजे गल्ली येथे कटलरी सामान विक्री करणाऱ्या विक्रेत्याला काही कारण नसताना एकाकडून शिवीगाळ करत छत्रीच्या काठीने बेदम मारहाण करून हाताला आणि पाठीला दुखापत केल्याची घटना बुधवारी घडली आहे. या संदर्भात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
मधुकर चिंतामणी वाणी (वय-५५, रा. ईश्वर कॉलनी जळगाव) कटलरी सामान विक्री करून आपला उदरनिर्वाह करतात. २१ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मधुकर वाणी हे भजे गल्ली परिसरामध्ये लोडगाडीवर आपला कटलरी सामान विक्री करत होते. त्यावेळी काही कारण नसताना हर्षल विजय चौरसिया (रा. नाथवाडा शिंदे कॉलनी जळगाव) याने शिवीगाळ करत दमदाटी केली. तसेच दुकानाची छत्रीच्या काठीने त्यांच्या हाताला आणि पाठीवर मारून दुखापत केली. या संदर्भात मधुकर वाणी यांनी जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली आहे त्यानुसार सायंकाळी ५ वाजता संशयित आरोपी हर्षल विजय चौरसिया (रा. सिंधी कॉलनी, जळगाव) यांच्या विरोधात जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र पाटील करत आहे.