यावलमध्ये १९ मे रोजी श्री स्वामी समर्थ पालखी सोहळा


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  अक्कलकोट निवासी अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखी–पादुकांचे आगमन यावल शहरात १९ मे २०२५ रोजी होणार असून, या भक्तिभावपूर्ण आणि अध्यात्मिक वातावरणात यावलकरांना दिव्य दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट या न्यासाच्या वतीने या पालखी परिक्रमेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्वामी समर्थ महाराजांच्या मूळ स्थानी असलेल्या अक्कलकोट येथे अनेक भक्तांना वयोमर्यादा, आरोग्य कारणे किंवा अन्य अडचणींमुळे प्रत्यक्ष दर्शनासाठी जाता येत नाही. अशा भाविकांपर्यंत श्रींचे चरणदर्शन पोहोचावे या हेतूने राज्यातील विविध भागांत ही पालखी परिक्रमा सुरू आहे. भक्तांची सेवा आणि त्यांच्या श्रद्धेला उत्तर म्हणून स्वामी समर्थ महाराज आपल्या पादुकांच्या माध्यमातून थेट त्यांच्या गावी येत आहेत, ही भाविकांसाठी आनंदाची आणि अध्यात्मिक उन्नतीची संधी ठरणार आहे.

यावल शहरात पालखीचे आगमन सोमवार, दिनांक १९ मे २०२५ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता धनश्री टॉकीज, बोरवाल गेट येथून होणार आहे. मान्यवरांच्या हस्ते विधीवत पूजनानंतर पालखी मिरवणूक शहरातील मुख्य रस्त्यांवरून पार पडणार आहे. या मिरवणुकीचा मार्ग बोरवाल गेट, गवत बाजार, अपना बाजार, महाजन टी डेपो, चावडी मार्ग कोर्ट रोड, रेणुकादेवी मंदिर, शिवाजीनगर असा असून, संध्याकाळी ७ वाजता प्रा. मुकेश येवले यांच्या निवासस्थानी पालखीचे आगमन होईल. तेथे महापूजा, आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या सोहळ्याचे आयोजन प्रा. मुकेश येवले आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सलग १५ वर्षांपासून भक्तिभावाने करत आहेत. शहरात भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, ही या आयोजनामागील भावना आहे. प्रा. येवले यांचा निवासस्थान हा या दिवशी अध्यात्मिक शक्तीचा केंद्रबिंदू ठरणार असून, दिव्य वातावरणात भक्त एकत्र येणार आहेत.

त्यानंतर, मंगळवार दिनांक २० मे २०२५ रोजी सकाळी ७ वाजता श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पादुकांचे अभिषेक विधी पार पडेल. अभिषेकानंतर पालखीचे पुढील प्रस्थान फैजपूर शहराकडे होणार आहे. आयोजकांनी सर्व स्वामीभक्तांना या पालखी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.