
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरात तुळशीलीला बहुउद्देशीय संस्था आणि इंदुबाई बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक सद्भाव बैठकीला समाज बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जुना असोदा रोडवरील पिवळ्या भिंती परिसरातील महर्षी वाल्मिक क्रीडांगणावर पार पडलेल्या या बैठकीत समाज प्रबोधन, सामाजिक एकोपा आणि आगामी राष्ट्रीय अधिवेशनाच्या तयारीबाबत सखोल मंथन करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कोळी समाजातील गुणवंतांचा गौरव करण्यात आल्याने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महर्षी वाल्मिक यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. सामाजिक ऐक्य, शिक्षण आणि समाजाच्या प्रगतीसाठी एकत्रित प्रयत्नांची गरज असल्याचा संदेश या बैठकीतून देण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी भगवान कोळी होते, तर गुजरातमधील सानंद विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा अखिल भारतीय कोळी समाज, नवी दिल्लीचे युवक कार्यकारी अध्यक्ष कन्नूभाई पटेल हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय कोळी समाज संघटना महाराष्ट्र प्रदेशचे युवा अध्यक्ष ॲड. ओमप्रकाश बोईनवाड, ॲड. अमित सोनवणे, मुकेश सोनवणे, तुळशीलीला बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तुषार सैंदाणे आणि इंदुबाई बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा मंगला सोनवणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रभावी आणि अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन प्राध्यापक रत्नाकर कोळी यांनी केले.
बैठकीत नवी दिल्ली येथे होणाऱ्या आगामी अखिल भारतीय कोळी समाज अधिवेशनाच्या पूर्वतयारीबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली. समाज संघटन अधिक मजबूत करण्यासाठी युवकांचा सहभाग, शिक्षणाला प्राधान्य, समाजातील विविध घटकांना एकत्र आणणे आणि सामाजिक प्रश्नांवर सामूहिक भूमिका घेण्याबाबत मंथन करण्यात आले. यावेळी समाज बांधवांतर्फे आमदार कन्नूभाई पटेल यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते कोळी समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा गौरव सोहळा. न्यायाधीशपदी निवड झालेल्या प्रियंका संपकाळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच स्केटिंग क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थिनीचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. शिक्षण, क्रीडा, समाजकारण आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या समाज घटकांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
या सामाजिक सद्भाव बैठकीला जळगाव जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



