Home Cities मुक्ताईनगर डिझेल टंचाईला ‘आपत्ती’ घोषित करा; रोहिणी खडसे यांची सरकारकडे मागणी

डिझेल टंचाईला ‘आपत्ती’ घोषित करा; रोहिणी खडसे यांची सरकारकडे मागणी


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या तणावाचा परिणाम आता जागतिक अर्थव्यवस्थेसह भारतातील इंधन दरांवरही होताना दिसत आहे. देशात डिझेल आणि इतर इंधनाच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी वर्गही मोठ्या संकटात सापडला आहे. ऐन पेरणी हंगामात निर्माण झालेल्या डिझेल टंचाईमुळे शेतीची कामे खोळंबत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राज्य सरकारकडे महत्त्वाची मागणी केली आहे. डिझेल टंचाईला “आपत्ती” म्हणून जाहीर करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना पत्राद्वारे केली आहे.

रोहिणी खडसे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, पावसाळा तोंडावर आला असून राज्यातील शेतकरी पेरणीपूर्व तयारीत व्यस्त आहेत. ट्रॅक्टर, पाण्याचे पंप, मशागतीची यंत्रे आणि शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या विविध अवजारांसाठी डिझेल अत्यावश्यक आहे. मात्र सध्या डिझेल दरवाढ, अपुरा साठा आणि उपलब्धतेबाबत असलेला संभ्रम यामुळे शेतकऱ्यांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना तासन्तास पेट्रोल पंपांवर प्रतीक्षा करावी लागत असून तरीही डिझेल मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.

या पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे यांनी सरकारसमोर काही महत्त्वपूर्ण उपाययोजना सुचवल्या आहेत. त्यांनी सर्वप्रथम ऐन शेती हंगामात निर्माण झालेली डिझेल टंचाई ही “आपत्ती” म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. तसेच प्रत्येक तालुक्यात तहसील कार्यालयांतर्गत “शेतकरी डिझेल मदत कक्ष” तातडीने सुरू करण्यात यावा, जेणेकरून शेतकऱ्यांना प्रशासनाशी थेट संवाद साधता येईल, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.

याशिवाय डिझेल टंचाई पूर्णपणे दूर होईपर्यंत मदत कक्ष २४ तास सुरू ठेवण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. तालुक्यातील सर्व पेट्रोल पंपांवरील डिझेल साठ्याची माहिती दर तासाला सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि मदत कक्षामार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. प्रत्येक पेट्रोल पंपावरील किमान ३० टक्के डिझेल साठा हा शेतकऱ्यांसाठी राखीव ठेवण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

शेतकऱ्यांना डिझेल मिळवताना होणारा त्रास कमी करण्यासाठी ट्रॅक्टर किंवा वाहन प्रत्यक्ष पंपावर आणण्याची सक्ती करू नये, अशी मागणीही रोहिणी खडसे यांनी केली आहे. शेतकऱ्यांनी आणलेल्या सुरक्षित कॅन, ड्रम किंवा बॅरलमध्ये डिझेल देण्यास परवानगी देण्यात यावी, असे त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.

दरम्यान, देशात इंधन दरवाढीचा भडका उडालेला असताना CNG च्या दरातही पुन्हा वाढ करण्यात आली आहे. आजपासून CNG प्रति किलो दोन रुपयांनी महागला असून गेल्या पंधरा दिवसांतील ही चौथी दरवाढ आहे. यापूर्वी २३ मे रोजीही CNG दरवाढ करण्यात आली होती. सतत वाढणाऱ्या इंधन दरांमुळे वाहनचालक, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडले असून सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी सर्व स्तरांतून होत आहे.

शेती हंगामाच्या तोंडावर निर्माण झालेल्या डिझेल टंचाईमुळे राज्यातील ग्रामीण भागात चिंता वाढली असून शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारने तातडीने ठोस निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. रोहिणी खडसे यांनी मांडलेल्या मागण्यांमुळे हा मुद्दा आता अधिक चर्चेत आला असून प्रशासनाची पुढील भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 


Protected Content

Play sound