Home प्रशासन पत्रकार निलेश मेढे यांना ‘आदर्श पत्रकार पुरस्कार २०२६’ प्रदान

पत्रकार निलेश मेढे यांना ‘आदर्श पत्रकार पुरस्कार २०२६’ प्रदान

0
17

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । संत मुक्ताईच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि वारकरी परंपरेचे सातत्यपूर्ण व संवेदनशील वृत्तांकन करून ही परंपरा जनमानसापर्यंत पोहोचविणारे मुक्ताईनगर येथील पत्रकार निलेश मोहन मेढे यांचा ‘संत मुक्ताई सेवेच्या ठायी आदर्श पत्रकार पुरस्कार २०२६’ देऊन गौरव करण्यात आला. श्रीक्षेत्र कोथळी येथील संत मुक्ताई मूळ मंदिरात १८ ऑगस्ट रोजी भक्तिमय वातावरणात हा पुरस्कार सोहळा पार पडला. संत मुक्ताई संस्थान श्रीक्षेत्र कोथळी व मुक्ताईनगर तसेच संत मुक्ताई पालखी आगमन सोहळा उत्सव समिती यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी पत्रकार निलेश मेढे यांना संत मुक्ताईची मूर्ती, सन्मानपत्र, रुमाल व टोपी देऊन सन्मानित करण्यात आले. संत मुक्ताबाई यांच्या पावन तीर्थक्षेत्राची आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि वारकरी परंपरा समाजाच्या विविध स्तरांपर्यंत पोहोचविण्यासाठी मेढे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पत्रकारितेची दखल घेत हा गौरव करण्यात आला.

.संत मुक्ताई तीर्थक्षेत्रातील पंधरवडी एकादशी, मासिक एकादशी वारी, विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम तसेच संत मुक्ताई पालखी सोहळ्याच्या प्रस्थानापासून आगमनापर्यंतच्या विविध घडामोडींचे त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. या माध्यमातून संत मुक्ताईच्या भक्तीपरंपरेशी जोडलेल्या विविध घटना, कार्यक्रम आणि धार्मिक उपक्रम लाखो भाविक, वारकरी आणि वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांनी केले.

पत्रकारितेच्या माध्यमातून संत विचार, वारकरी संस्कृती, भक्ती, सेवा आणि संत मुक्ताई तीर्थक्षेत्राची महती समाजापर्यंत पोहोचविणाऱ्या त्यांच्या कार्याचे यावेळी कौतुक करण्यात आले. निःस्वार्थ, सातत्यपूर्ण आणि संवेदनशील पत्रकारितेची दखल घेत संस्थान आणि उत्सव समितीने त्यांना हा पुरस्कार प्रदान केला.

पुरस्कार वितरण सोहळ्यास संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, पालखी सोहळा प्रमुख रविंद्र महाराज हरणे, महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज, ह.भ.प. उद्धव महाराज जुनारे, ह.भ.प. विशाल महाराज खोले, विश्वस्त पंजाबराव पाटील, सदाशिव पाटील, पुरुषोत्तम वंजारी, श्रीकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय पत्रकार मोतीलाल जोगी, संतोष मराठे, राजेश चौधरी, संदीप जोगी, छबिलदास पाटील, अमोल वैद्य आदी उपस्थित होते. यावेळी संत मुक्ताई पालखी आगमन सोहळा उत्सव समितीचे पदाधिकारी, मुक्ताईनगर येथील पत्रकार बांधव, संत मुक्ताई संस्थानचे विश्वस्त, वारकरी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संत मुक्ताईच्या कार्याचा तसेच वारकरी परंपरेचा प्रसार करणाऱ्या पत्रकारितेचा झालेला हा सन्मान उपस्थितांसाठी विशेष कौतुकाचा आणि प्रेरणादायी ठरला.


Protected Content

Play sound