रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देत कृषी आणि शेतीपूरक व्यवसायांना आर्थिक पाठबळ देण्याच्या उद्देशाने सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वतीने रावेर येथे मेगा कृषी कर्ज महाशिबिराचे आयोजन करण्यात आले. या महाशिबिराला शेतकरी, स्वयंसहाय्यता गटांचे सदस्य, उद्योजक, निर्यातदार आणि ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे, या कार्यक्रमात शेती व शेतीपूरक उपक्रमांसाठी तब्बल २३ कोटी रुपयांच्या कर्ज मंजुरीचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला गटविकास अधिकारी विनोद जी, तहसीलदार पाटील जी, निर्यातदार विशाल अग्रवाल, प्रादेशिक प्रमुख रमेश जेठानी, कृषी विज्ञान केंद्राचे (केव्हीके) प्रतिनिधी महेश महाजन, एमएसआरएलएमचे जिल्हा समन्वयक चंद्रकांत सोनावणे तसेच जळगावचे अग्रणी जिल्हा व्यवस्थापक (एलडीएम) सुनिलकुमार दोहरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

महाशिबिरात शेतकरी आणि संबंधित लाभार्थ्यांना कृषी कर्जाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या आर्थिक संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे जिल्ह्यातील शेती तसेच शेतीपूरक व्यवसायांना चालना देण्यासाठी कर्ज मंजुरीचे वितरण करण्यात आल्याने शेतकऱ्यांना उत्पादनवाढ, कृषी प्रक्रिया, व्यवसाय विस्तार आणि आधुनिक शेतीसाठी आवश्यक भांडवल उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
यावेळी निर्यातदार विशाल अग्रवाल यांनी जळगाव जिल्ह्यातील विशेषतः केळी उत्पादनाला असलेल्या निर्यातीच्या मोठ्या संधींबाबत मार्गदर्शन केले. केळी आणि केळीपासून तयार होणाऱ्या विविध उत्पादनांसाठी देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठ विस्तारण्याच्या संधी, मूल्यवर्धन आणि निर्यातक्षम उत्पादनांच्या निर्मितीबाबत त्यांनी उपस्थितांना माहिती दिली. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत बाजारपेठेचा विचार करून उत्पादन आणि प्रक्रिया क्षेत्राकडेही वळण्याची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित झाले.
कृषी विज्ञान केंद्राचे प्रतिनिधी महेश महाजन यांनी आधुनिक शेती पद्धतींबाबत शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन केले. पिकांची उत्पादकता वाढविणे, उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करणे आणि शेतीमधून मिळणारे उत्पन्न वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब करण्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.
महाशिबिरात स्वयंसहाय्यता गटांच्या सदस्यांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग राहिला. महिला व ग्रामीण भागातील विविध गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बँकिंग सुविधा, कर्जपुरवठा आणि उद्योजकतेच्या संधी महत्त्वाच्या ठरत असल्याचे यावेळी दिसून आले. शेतकरी, उद्योजक, निर्यातदार, बँका आणि शासकीय यंत्रणा यांच्यातील समन्वयातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला अधिक गती देता येऊ शकते, यावरही कार्यक्रमात भर देण्यात आला.
जळगाव जिल्ह्याची कृषी परिसंस्था अधिक मजबूत करण्यासाठी बँकिंग क्षेत्र, शासकीय विभाग, कृषी तज्ज्ञ, निर्यातदार आणि इतर संबंधित घटकांनी परस्पर सहकार्य वाढविण्याची आवश्यकता या महाशिबिरातून अधोरेखित झाली. कृषी क्षेत्राला वेळेवर आणि पुरेसा वित्तपुरवठा मिळाल्यास शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्याबरोबरच शेतीपूरक व्यवसाय उभारण्यासही मोठी मदत होऊ शकते. जळगावचे अग्रणी जिल्हा व्यवस्थापक (एलडीएम) सुनिलकुमार दोहरे यांनी आभार मानले.



