Home धर्म-समाज गांधी-शास्त्री जयंतीनिमित्त फैजपूर, रावेर व यावलमध्ये २ ऑक्टोबरला प्रभातफेरी ; नागरिकांना सहभागी...

गांधी-शास्त्री जयंतीनिमित्त फैजपूर, रावेर व यावलमध्ये २ ऑक्टोबरला प्रभातफेरी ; नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

0
8

सावदा -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार, २ ऑक्टोबर २०२६ रोजी फैजपूर, रावेर आणि यावल शहरात सकाळी ७.३० वाजता प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. गांधीजींचा सत्य, अहिंसा, सर्वधर्मसमभाव आणि सामाजिक सलोख्याचा विचार तसेच शास्त्रीजींचा साधेपणा, राष्ट्रनिष्ठा आणि ‘जय जवान, जय किसान’चा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या प्रभातफेऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

फैजपूर शहरात सकाळी ७.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ नागरिक एकत्र येणार आहेत. पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर प्रभातफेरीला सुरुवात होईल. त्यानंतर प्रभातफेरी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यापर्यंत जाईल. तेथे अभिवादन केल्यानंतर पुढे छत्री चौकातील स्वातंत्र्य स्मारकाजवळ प्रभातफेरीचा समारोप करण्यात येणार आहे. रावेर शहरातही सकाळी ७.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एकत्रीकरण होणार आहे. पुतळ्यास अभिवादन करून प्रभातफेरी मुख्य बाजारपेठेतून महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापर्यंत नेण्यात येईल. गांधीजींच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. यावल शहरात सकाळी ७.३० वाजता बोरावल गेट येथून प्रभातफेरीला सुरुवात होईल. शहराच्या मुख्य बाजारपेठेतून प्रभातफेरी मार्गक्रमण करत बुरुज चौक येथे पोहोचेल. तेथे प्रभातफेरीचा समारोप करण्यात येणार आहे.

महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या विचारांचे स्मरण करण्याबरोबरच सत्य, अहिंसा, शांतता, सद्भावना आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश समाजात पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जाणार आहे. गांधी-शास्त्री विचारांवर श्रद्धा असलेल्या स्थानिक नागरिकांच्या पुढाकारातून या प्रभातफेऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. फैजपूर, रावेर आणि यावल शहरांसह परिसरातील नागरिक, युवक-युवती, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक नागरिकांच्या वतीने करण्यात आले आहे. गांधी-शास्त्री जयंतीनिमित्त आयोजित या प्रभातफेऱ्यांमधून सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.


Protected Content

Play sound