Home प्रशासन नगरपालिका मुक्ताईनगरमध्ये कचऱ्याचे ढिगारे वाढले ; घंटागाड्या अनियमित, नागरिक त्रस्त

मुक्ताईनगरमध्ये कचऱ्याचे ढिगारे वाढले ; घंटागाड्या अनियमित, नागरिक त्रस्त

0
7

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहरातील कचरा संकलनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून शहरातील अनेक भागांमध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचल्याचे चित्र दिसत आहे. नियमित कचरा संकलन होत नसल्याने नागरिकांना दुर्गंधी, अस्वच्छता आणि वाढत्या कचऱ्याचा त्रास सहन करावा लागत असून नगरपंचायतीच्या कचरा व्यवस्थापनाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

गेल्या आठवडाभरापासून शहरातील विविध भागांमध्ये कचरा संकलनासाठी घंटागाड्या नियमितपणे येत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. काही भागांमध्ये एखादीच कचरा संकलनाची गाडी फिरताना दिसत असल्याने संपूर्ण शहरासाठी करण्यात आलेले कचरा संकलनाचे नियोजन नेमके कुठे अडले आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. नियमित कचरा उचलला जात नसल्यामुळे गल्लीबोळ तसेच रहिवासी परिसरांमध्ये कचरा साचत आहे. अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे तयार झाल्याने परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. साचलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत असून नागरिकांना दैनंदिन जीवनात मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कचरा संकलनाची व्यवस्था सुरळीत करण्यासाठी घंटागाड्यांचे नियमित वेळापत्रक निश्चित करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज व्यक्त होत आहे. शहरातील प्रत्येक भागात नियमितपणे कचरा संकलन होईल, यासाठी नगरपंचायत प्रशासनाने यंत्रणेचे नियोजन करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

“प्रत्येक गल्लीमध्ये नियमित कचरा संकलनाची व्यवस्था कधी सुरू होणार?” तसेच “शहरातील विविध भागांमध्ये साचलेले कचऱ्याचे ढिगारे कधी हटवले जाणार?” असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. कचरा वेळेवर उचलला गेला नाही तर अस्वच्छतेची समस्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे. नगरपंचायतीने केवळ कागदोपत्री उपाययोजना न करता प्रत्यक्ष शहरातील परिस्थितीची पाहणी करावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. ज्या भागांमध्ये कचरा साचला आहे तेथे तातडीने स्वच्छता मोहीम राबवून कचरा हटवावा आणि त्यानंतर नियमित कचरा संकलनाची व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी होत आहे.


Protected Content

Play sound