Home Cities जामनेर जामनेरच्या आबासाहेब पाटील यांच्या समाजकार्याची राज्यस्तरावर दखल; ‘जाणीव पुरस्कार’ने सन्मान

जामनेरच्या आबासाहेब पाटील यांच्या समाजकार्याची राज्यस्तरावर दखल; ‘जाणीव पुरस्कार’ने सन्मान

0
3


जामनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । समाजहितासाठीविविध क्षेत्रांत सातत्याने निस्वार्थीपणे कार्य करणारे समाजसेवक आबासाहेब पाटील यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत राज्यस्तरीय जाणीव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाशिक येथील पी.एस.ए. नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर, शिवाजी राजे जाधव यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते आणि शेकडो चाहत्यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

जाणीव सांस्कृतिक संस्थेच्या वतीने आयोजित या पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. समाजसेवक आबासाहेब पाटील यांच्या सामाजिक आणि समाजोपयोगी उपक्रमांची दखल घेत त्यांची राज्यस्तरीय जाणीव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. आयोजक जगन्नाथ पाटील यांनी आबासाहेब पाटील यांच्या निस्वार्थ सामाजिक कार्यामुळे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचे सांगितले.

आबासाहेब पाटील यांनी समाजाच्या हितासाठी गेल्या अनेक वर्षांपासून विविध उपक्रम राबविले आहेत. वधू-वर मेळावे, शिवजयंती महोत्सव, कोरोना काळात लसीकरण महाशिबिर, स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन व विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप, बेरोजगार युवकांना उद्योगासाठी प्रेरणा देणे आणि त्यांना आवश्यक सहकार्य करणे, अशा विविध उपक्रमांतून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.

याशिवाय सर्व महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीचे आयोजन, सामाजिक प्रबोधनात्मक उपक्रम, वेळेवर विवाह करणाऱ्या जोडप्यांना ५ हजार रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस तसेच दोन मुली झालेल्या कुटुंबांना ५ हजार रुपयांचे बक्षीस देण्याचा उपक्रमही त्यांनी राबविला आहे. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणाची सुरुवात स्वतःच्या बांधापासून करून त्यांनी इतरांनाही वृक्षसंवर्धनासाठी प्रेरित केले आहे.

क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक, व्यावसायिक, सहकार, सामाजिक, धार्मिक, वैद्यकीय आणि कृषी अशा विविध क्षेत्रांत आबासाहेब पाटील यांचे योगदान राहिले आहे. त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू समाजहित आणि सर्वसामान्यांना विविध माध्यमांतून मदत उपलब्ध करून देणे हा राहिला आहे.

आबासाहेब पाटील यांचे मूळगाव कुंभारीसिम, ता. जामनेर असून ते विविध सामाजिक संस्थांशी संबंधित आहेत. ते आबासाहेब पाटील फाऊंडेशनचे अध्यक्ष, अंधश्रद्धा निर्मूलन समिती जामनेरचे उपाध्यक्ष, उद्योजक कक्ष जळगावचे माजी जिल्हाध्यक्ष, गुजरात राज्य प्रदेशाध्यक्ष-सहकार कक्ष, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष-वसतिगृह कक्ष तसेच राष्ट्रीय समन्वयक-वधू-वर कक्ष आदी जबाबदाऱ्या सांभाळत आहेत.

समाजातील विविध घटकांसाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या आबासाहेब पाटील यांच्या कार्याची दखल यापूर्वीही विविध संस्थांनी घेतली आहे. त्यांच्या सामाजिक कार्यासाठी आतापर्यंत ४० हून अधिक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे. राज्यस्तरीय जाणीव पुरस्कारामुळे त्यांच्या सामाजिक कार्याला आणखी एक महत्त्वाची दखल मिळाली असून, या सन्मानाबद्दल त्यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

आबासाहेब पाटील यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करणारा राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार हा त्यांच्या सातत्यपूर्ण समाजसेवेची दखल मानला जात असून, विविध क्षेत्रांत सुरू असलेल्या त्यांच्या उपक्रमांना या सन्मानामुळे प्रोत्साहन मिळाले आहे.

 


Protected Content

Play sound