
मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील प्रभाग क्रमांक १३ मध्ये भोई समाजासाठी उभारण्यात आलेल्या मंगल कार्यालयाचे लोकार्पण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. मा. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या मंगल कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संत शिरोमणी भीमा भोई यांच्या १७८ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले तसेच भोई समाज बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या.

भोई समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि विविध कौटुंबिक कार्यक्रमांसाठी उभारण्यात आलेले हे मंगल कार्यालय समाजासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. आधुनिक सुविधा आणि प्रशस्त जागेमुळे हे केंद्र भविष्यात विविध सामाजिक उपक्रम, बैठका, विवाह समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी उपयुक्त ठरणार असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
कार्यक्रमात बोलताना मा. आमदार चंद्रकांत पाटील यांनी समाज एकजूट आणि सामाजिक विकासासाठी अशा वास्तूंचे मोठे महत्त्व असल्याचे सांगितले. समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचे कार्य या मंगल कार्यालयातून होईल तसेच सामाजिक ऐक्य आणि बंधुभाव वृद्धिंगत करण्यासाठी हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी भोई समाज जिल्हाध्यक्ष एस. ए. भोई, शिवसेना उपजिल्हाप्रमुख छोटूभाऊ भोई, शिवसेना अल्पसंख्यांक महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष अफसर खान, युवासेना जिल्हाप्रमुख पंकज राणे, शिवसेना उपजिल्हा संघटक पंकज कोळी, पंकज पांडव, सतीश नागरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच भोई समाज संघटनेतील पदाधिकारी, माजी नगरसेवक निलेश शिरसाठ, नगरसेवक संतोष कोळी, नगरसेवक गणेश टोंगे, माजी नगरसेवक मुकेश वानखेडे, भोई समाज तालुका अध्यक्ष प्रवीण भोई, राजू वानखेडे आणि शिवसेना-युवासेना परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान संत भीमा भोई यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. समाजप्रबोधन, समता आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या संत भीमा भोई यांच्या विचारांचे स्मरण करून उपस्थितांनी त्यांच्या कार्याला अभिवादन केले. समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण, एकजूट आणि सामाजिक बांधिलकी महत्त्वाची असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.



