
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मध्य प्रदेशातील रीवा येथे झालेल्या भीषण कार अपघातात दोन जैन साध्वींच्या दुर्दैवी निधनाच्या घटनेनंतर जळगाव शहरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या दुर्घटनेच्या निषेधार्थ आणि दोषींवर कठोर कारवाई तसेच निष्पक्ष चौकशीच्या मागणीसाठी आज सकल दिगंबर जैन समाजातर्फे भव्य मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. शांततापूर्ण स्वरूपात निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकत प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

२० मे रोजी रीवा येथे घडलेल्या या दुर्घटनेत संत शिरोमणी श्री विद्यासागरजी महाराज यांच्या परम शिष्या १०५ आर्यिका श्रुतमती माताजी आणि आर्यिका उपशममती माताजी यांचे अपघाती निधन झाले. या घटनेने देशभरातील जैन समाजात शोककळा पसरली असून धार्मिक समुदायामध्ये तीव्र वेदना आणि संतापाची भावना निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर जळगावात समाजबांधवांनी एकत्र येत निषेध व्यक्त करण्याचा निर्णय घेतला.
आज सकाळी जळगाव शहरातील पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरापासून या मूक मोर्चाची सुरुवात झाली. हातात निषेध फलक, शांततेत चालत आणि कोणताही गोंगाट न करता निघालेला हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गांवरून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचला. मोर्चादरम्यान संपूर्ण वातावरण शिस्तबद्ध आणि गंभीर स्वरूपाचे होते. समाजबांधवांनी शांततेच्या मार्गाने आपला रोष व्यक्त करत प्रशासनाचे लक्ष या गंभीर घटनेकडे वेधले.
जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर शिष्टमंडळाने प्रशासनाला निवेदन सादर केले. या निवेदनात रीवा अपघात प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच विहार करणाऱ्या साधू-साध्वींच्या सुरक्षिततेसाठी देशभरात ठोस आणि प्रभावी सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचेही नमूद करण्यात आले.
या भव्य मूक मोर्चात जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, दिगंबर जैन समाजाचे अध्यक्ष आशिष जैन, ट्रस्टी प्रदीप जैन, सचिव मनोज पटणी यांच्यासह समाजातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येत या घटनेबद्दल तीव्र शोक आणि निषेध व्यक्त केला.



