अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील अंतुर्ली येथील एका शेतमजूर आदिवासी महिलेला प्रसूतीसाठी रुग्णालयात नेले जात असताना रस्त्यातच प्रसूती वेदना असह्य होऊन तिची रिक्षातच प्रसूती झाल्याची घटना घडली. १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक आणि वैद्यकीय पथकाने वेळेवर धाव घेतल्याने बाळ आणि माता दोन्ही सुखरूप आहेत.
अंतुर्ली येथील शेतमजुरी करणाऱ्या संगीता पावरा या महिलेचे दिवस भरल्याने तिला तीव्र प्रसूती कळा जाणवू लागल्या. त्यामुळे तिचे पती तिला पॅजो रिक्षामधून अमळनेर येथील रुग्णालयात उपचारासाठी घेऊन येत होते. मात्र, नंदगाव रस्त्यावरील तांबेपुरा भागात पोहोचताच प्रसूती कळा वाढून महिलेची रिक्षातच प्रसूती होण्याची वेळ आली.
या घटनेची माहिती मिळताच परिसरात तत्परता दाखवत नगरसेविका अफसाना खाटीक, अंतुर्ली रंजानेचे सरपंच सचिन पाटील, माजी नगरसेवक मुख्तार खाटीक, माजी नगरसेवक बाळा पवार यांच्यासह परिसरातील महिला तात्काळ मदतीसाठी धावून आल्या. त्यांनी प्रसंगावधान राखून महिलेला आवश्यक ते सहकार्य पुरवले आणि परिस्थिती हाताळली.
घटनेचे गांभीर्य ओळखून ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रकाश ताळे यांना तातडीने संपर्क साधण्यात आला. डॉ. ताळे यांनी क्षणाचाही विलंब न लावता रुग्णवाहिका आणि आरोग्य कर्मचारी योगिता कुलकर्णी यांना तातडीने घटनास्थळी रवाना केले. आरोग्य पथकाने घटनास्थळी पोहोचून महिलेची सुखरूप प्रसूती केली.
प्रसूतीनंतर बाळ आणि मातेला पुढील वैद्यकीय देखरेखीसाठी आणि उपचारासाठी अमळनेरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या बाळ आणि माता दोन्ही पूर्णपणे सुखरूप असून त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहेत. सर्वसामान्य नागरिक, लोकप्रतिनिधी आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या या वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे एक मोठा अनर्थ टळला आहे.



