Home Cities अमळनेर मांडळ येथील ब्रिटिशकालीन बंधाऱ्याची दुरुस्ती करा ; डॉ. दीपक पाटील यांची मंत्री...

मांडळ येथील ब्रिटिशकालीन बंधाऱ्याची दुरुस्ती करा ; डॉ. दीपक पाटील यांची मंत्री गिरीश महाजनांकडे निधीची मागणी

0
1

अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील मांडळ गावाजवळ पांझरा नदीवर असलेला सुमारे २०० वर्षे जुना ब्रिटिशकालीन दगडी बंधारा नादुरुस्त झाला असून, त्यातून मोठ्या प्रमाणात पाणीगळती होत आहे. या बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती करून आवश्यक निधी मंजूर करावा, अशी मागणी पंचायत समितीचे माजी सभापती तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य डॉ. दीपक पंढरीनाथ पाटील यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

डॉ. पाटील यांनी १७ नोव्हेंबर २०२६ रोजी दिलेल्या निवेदनात मांडळ गावाजवळील पांझरा नदीवरील या ऐतिहासिक बंधाऱ्याच्या सद्यस्थितीकडे शासनाचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, या बंधाऱ्यामुळे नदीपात्रात सुमारे पाच किलोमीटर लांबीचा आणि २० फूट रुंदीचा वाळूचा थर तयार झाला आहे. मात्र, बंधाऱ्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून, त्याच्या खालून मोठ्या प्रमाणात पाणी गळत आहे. बंधाऱ्यातील खड्यांमधून पाण्यासोबत वाळूही बाहेर वाहून जात असल्याने भविष्यात गंभीर परिणाम होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. मांडळ, वावडे आणि जवखेडा या गावांतील पिण्याच्या पाण्याच्या विहिरींसाठी या बंधाऱ्यामुळे निर्माण झालेला वाळूचा थर महत्त्वाचा ठरत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या परिसरातील विहिरींना पाणी उपलब्ध होण्यास या साठ्याचा आधार मिळत आहे. मात्र, बंधारा पूर्णपणे फुटल्यास नदीपात्रातील वाळू वाहून जाऊ शकते आणि परिणामी परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरी कोरड्या पडण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता डॉ. पाटील यांनी व्यक्त केली आहे.

त्यामुळे सुमारे दोनशे वर्षे जुन्या या दगडी बंधाऱ्याची केवळ तात्पुरती डागडुजी न करता संपूर्ण आणि दर्जेदार दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच बंधाऱ्यावर दोन फूट काँक्रीट टाकून त्याची मजबुती वाढवावी, जेणेकरून अधिक प्रमाणात पाणी अडविणे शक्य होईल, अशी सूचनाही निवेदनात करण्यात आली आहे. यंदा परिसरात भीषण दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेऊन आवश्यक निधी मंजूर करावा, अशी विनंती डॉ. पाटील यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्यापूर्वीच प्रशासनाने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे.


Protected Content

Play sound