फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । फैजपूर नगरपरिषदेच्या दवाखान्यात गेल्या काही काळापासून बंद असलेले सौ. लीलावती प्रसूतिगृह तातडीने सुरू करावे, तसेच शहरातील मुस्लिम कब्रस्थानात वजूखान्यासह आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात मंगळवारी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांना निवेदन देण्यात आले.
फैजपूर शहराची लोकसंख्या सध्या ४० हजारांहून अधिक झाली आहे. पूर्वी शहराची लोकसंख्या तुलनेने कमी असतानाही नगरपरिषदेचे सौ. लीलावती प्रसूतिगृह कार्यरत होते. मात्र, सध्या हे प्रसूतिगृह बंद असल्याने विशेषतः गोरगरीब आणि सर्वसामान्य नागरिकांना प्रसूतीसाठी खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांवर अतिरिक्त खर्चाचा भार पडत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

फैजपूर शहराला लागून अनेक गावांचा परिसर असून, या भागातील नागरिकही विविध आरोग्य सेवांसाठी शहरात येतात. त्यामुळे नगरपरिषदेच्या दवाखान्यातील प्रसूतिगृह पुन्हा सुरू झाल्यास शहरासह परिसरातील महिलांना मोठा दिलासा मिळू शकतो. उपलब्ध असलेल्या या आरोग्य सुविधेचा नागरिकांना लाभ मिळावा, यासाठी प्रशासनाने तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली.
यासोबतच फैजपूर नगरपरिषद हद्दीतील मुस्लिम बांधवांच्या कब्रस्थानातील सुविधांचाही प्रश्न निवेदनाद्वारे मांडण्यात आला. कब्रस्थानात दफनविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना वजू करण्यासाठी सध्या कोणतीही व्यवस्था उपलब्ध नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे कब्रस्थान परिसरात स्वतंत्र वजूखाना उभारण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
तसेच कब्र खोदण्यासाठी लागणारे साहित्य ठेवण्यासाठी कब्रस्थान परिसरात एक छोटी खोली बांधून द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. खिरोद्या रस्त्याकडील गेटमधून इस्लामपुरा, हजिरा मोहल्ला, तडवी वाडा, झोपडपट्टी आणि तहानगर परिसरातील नागरिक दफनविधीसाठी कब्रस्थानात येत असतात. त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे पदाधिकाऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे.
शहरातील आरोग्य सुविधा आणि कब्रस्थानातील मूलभूत सुविधांशी संबंधित या मागण्यांचा नगरपरिषद प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी अपेक्षा निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली.
यावेळी आरोग्य समिती सभापती हकीम तडवी, माजी उपनगराध्यक्ष शेख कुर्बान, काँग्रेस गटनेते शेख इरफान, नगरसेवक शेख युनूस शेख अय्युब, नगरसेवक पवन सराफ, डॉ. शेख दानिश निसार आणि शेख आवेश शेख महेमुद उपस्थित होते. त्यांनी मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांच्याकडे निवेदन सादर केले. मुख्याधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून मागण्यांची दखल घेतली.



