Home Cities यावल फैजपूरच्या धनाजी नाना महाविद्यालयात नशामुक्ती जनजागृती; विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ

फैजपूरच्या धनाजी नाना महाविद्यालयात नशामुक्ती जनजागृती; विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ

0
9

फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या संकल्पनेतून ‘RISE नशामुक्ती युवा विकास भारत मिशन’ अंतर्गत फैजपूर पोलीस स्टेशनतर्फे धनाजी नाना कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, फैजपूर येथे नशामुक्ती जनजागृती कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुणाईला व्यसनाधीनतेच्या गंभीर धोक्यांची जाणीव करून देत सनदशीर मार्गाने दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रम उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील व विनोद गाभणे यांनी महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना अमली पदार्थ व विविध प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहण्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. व्यसनांमुळे होणारे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आर्थिक दुष्परिणाम किती घातक ठरू शकतात, याविषयी अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती देऊन विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण केली.
या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. मनोहर सुरवाडे यांनीही उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत निरोगी व व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षकवृंदांसह सुमारे २०० ते २५० विद्यार्थी-विद्यार्थिनींची उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी एकमुखाने नशामुक्तीची सामूहिक शपथ घेतली.
सूत्रसंचालन कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत यांनी केले, तर आभार प्रा. सीमा बारी यांनी मानले. फैजपूर पोलीस स्टेशनतर्फे राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत मोलाची जागरूकता निर्माण झाली असून ‘व्यसनमुक्त युवा – सक्षम भारत’ या संदेशाचा प्रसार करण्यात आला.

Protected Content

Play sound