कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची ‘मन की बात’ समजून घेतली असती तर… ! : शिवसेनेचा हल्ला

मुंबई प्रतिनिधी । तज्ञांनी खूप आधी दिलेला इशारा गांभीर्याने घेतला असता आणि आता येईल ती त्सुनामीच असेल ही दुसर्‍या लाटेची ‘मन की बात’ वेळीच समजून घेतली असती तर आज कोरोनाच्या त्सुनामीत देशाला गटांगळया खाण्याची वेळ आली नसती अशी टीका करत शिवसेनेने पुन्हा मोदींना लक्ष्य केले आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या दैनिक सामनामध्ये आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर जोरदार टीका करण्यात आली आहे. यात म्हटले आहे की, “अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठाच्या इन्स्टिटय़ूट फॉर हेल्थ मेट्रिक्स ऍण्ड इव्हॅल्यूशनने दिलेला इशारा काळजाचा ठोका चुकविणाराच आहे. या संस्थेने काढलेल्या निष्कर्षानुसार मे महिन्यात हिंदुस्थानात रोजचा कोरोना मृतांचा आकडा पाच हजारांवर पोहोचू शकतो. 12 एप्रिल ते 1 ऑगस्ट 2021 या कालावधीत देशातील कोरोना मृतांची संख्या तीन लाखांच्या पार जाऊ शकते. वॉशिंग्टनच्या या संस्थेने दिलेला हा इशारा आता तरी केंद्र सरकारने गांभीर्याने घ्यायला हवा.

यात पुढे म्हटले आहे की, ‘ऑक्सिजनअभावी रुग्णांचे तडफडून मृत्यू होत आहेत. या सगळय़ाच परिस्थितीचे खापर फक्त कोरोनाच्या त्सुनामीवर फोडता येणार नाही. आता सरकारतर्फे देशभरात ऑक्सिजनचा पुरवठा रेल्वेद्वारे केला जात आहे, त्यासाठी लष्कराचेही सहाय्य घेतले जात आहे. कोरोना लस, वैद्यकीय दर्जाचा प्राणवायू आणि त्याच्याशी संबंधित उपकरणे यांच्या सीमाशुल्कात सूट देण्याचाही निर्णय केंद्राने घेतला आहे. रेमडेसिवीरसारख्या अत्यंत तुटवडा जाणवणाऱ्या इंजेक्शनचाही पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न असल्याचे केंद्र सरकार सांगत आहे. हे सगळे ठीकच आहे, पण बेकाबू होऊ पाहणाऱ्या कोरोनाचे काय? हतबल झालेली आरोग्य व्यवस्था, उपचारांअभावी होणारे रुग्णांचे मृत्यू आणि त्यांच्या उद्ध्वस्त कुटुंबांचे काय?,” असे सवाल शिवसेनेने विचारले आहेत.

“आग्रा येथील एक बातमी मन विषण्ण करणारी आहे. बेड न मिळाल्याने ऑक्सिजनअभावी तडफडणाऱया पतीला रिक्षातच आपल्या तोंडाने श्वास देऊन त्याचे प्राण वाचविण्याचे केविलवाणे प्रयत्न त्याची पत्नी करीत होती. ही बातमी कोरोनाबाबतच्या सर्वच सरकारी दाव्यांचा पर्दाफाश करणारी आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत मैलोन्मैल पायपीट करीत आपल्या गावी निघालेले स्थलांतरितांचे लोंढे जगाला दिसले. आता कोरोनाच्या दुसऱया लाटेत आपल्या देशातील आरोग्य यंत्रणा पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळताना, ऑक्सिजन बेडअभावी कोरोना रुग्णांचे जीव जाताना जग पाहत आहे. हे सगळेच चित्र भयंकर आहे. सरकारकडून जे उपाय केले जात आहेत त्यामुळे भविष्यात कोरोना त्सुनामीचा प्रकोप कमी होईलही, पण तोपर्यंत ना गेलेले जीव परत येतील, ना त्यांची उद्ध्वस्त कुटुंबे सावरले जातील,” अशी खंत यात शिवसेनेने व्यक्त केली आहे.

Protected Content