लसीवरून राजकारण करणार्‍यांना भिडेंच्या भाषेतच उत्तर द्यावे लागेल : शिवसेना

मुंबई प्रतिनिधी । ”कोरोनाची लस ही जनतेसाठी असून राजकारणासाठी नाहीय….जे असे राजकारणाची वळवळ करत आहेत त्यांना Sambhaji Bhide संभाजी भिडे यांच्या भाषेतच उत्तर द्यावे लागेल” असा हल्लाबोल आज शिवसेनेने भाजपवर केला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या दैनिक सामनामध्ये सध्या कोरोनाच्या लसीवरून सुरू असणार्‍या दाव्या-प्रतिदाव्यांवर तिखट भाष्य केले आहे. यात म्हटले आहे की, कोरोनाचे संकट महाराष्ट्रात दिवसेंदिवस अधिक गडद होत चालले आहे. पण संकटाचे भान न ठेवता यानिमित्त जी राजकीय हुल्लडबाजी सुरू आहे ती महाराष्ट्राच्या परंपरेस शोभणारी नाही. महाराष्ट्रात कोरोनावरील लसीचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात आला व यामागे महाराष्ट्राला छळण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे. महाराष्ट्राची जनता म्हणजे टिनपाट किंवा गांडूची अवलाद असा समज केंद्राने अलीकडच्या काळात करून घेतला असेल तर ते भ्रमात आहेत. महाराष्ट्राच्या बाबतीत लसीचे राजकारण सुरू झाले ते निर्घृण आहे.Sambhaji Bhide भिडे यांनी कोरोनाग्रस्तांना ** म्हटले.

केंद्र सरकार महाराष्ट्राला लसपुरवठा करण्याबाबत जो अडेलतट्टूपणा करीत आहे तो ‘शिव’काळात झाला असता तर छत्रपती शिवाजीराजे काय किंवा छत्रपती संभाजीराजे काय, महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्यासाठी दिल्लीवर स्वारी करून पुन्हा रायगडावर परतले असते. ‘लसी’च्या बाबतीत सध्याचे दिल्लीश्वर जी मोगलाई चालवत आहेत ती औरंगजेबाच्याही वरताण आहे. पूर्वी महाराष्ट्राचे दिल्लीतील पुढारी पक्षीय मतभेद विसरून संकटकाळी महाराष्ट्राला कशी मदत होईल यासाठी एकत्र येऊन आकाशपाताळ एक करीत. आज चित्र पूर्णच पालटून गेले. पुण्याचे प्रकाश जावडेकर हे दिल्लीत बसून महाराष्ट्राविरोधी बदनामी मोहिमेचे नेतृत्व करतात हे दर्दनाक आहे.

यात पुढे नमूद केले आहे की, महाराष्ट्राची लोकसंख्या व कोरोना संक्रमणाची तीव्रता सगळय़ात जास्त असताना केंद्राने हे असे पक्षपाती वागणे माणुसकीला धरून नाही. महाराष्ट्राची जनता त्यांचीही कोणीतरी लागतच आहे. याच जनतेने भाजपचे 105 आमदार निवडून दिलेच आहेत. महाराष्ट्राला दर महिन्याला 1.6 कोटी तर आठवडय़ाला 40 लाख लसींच्या डोसची आवश्यकता आहे. जेणेकरून दिवसाला सहा लाख लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण होईल. गुजरातची लोकसंख्या महाराष्ट्रापेक्षा अर्धी, पण गुजरातला आतापर्यंत एक कोटी लसी मिळूनही तेथील कोरोना परिस्थिती महाराष्ट्रापेक्षा अतिगंभीर बनल्याचे निरीक्षण गुजरात हायकोर्टाने केले. महाराष्ट्राचे मॉडेल वापरा असे गुजरात हायकोर्टाने तेथील सरकारला बजावले.

यात शेवटी म्हटले आहे की, लसीचा ठणठणाट आहे व पंतप्रधानांनी ‘लस उत्सव’ साजरा करण्याचे फर्मान सोडले. पंतप्रधानांचा ‘लस उत्सव’ साजरा करण्यासाठी तरी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी दिल्लीत जाऊन एक कोटी लसींचे पार्सल घेऊन यावे. राजकीय भांडणे आहेत, पण त्या भांडणात आपल्याच लोकांचे जीव का घ्यायचे? महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेने कधीतरी आजच्या विरोधी पक्षालाही सत्तेवर बसवलेच होते. तेवढे तरी इमान राखा. ‘लस’ जनतेसाठी आहे. फालतूच्या राजकारणासाठी नाही. जे असे राजकारणाची वळवळ करीत आहेत त्यांना Sambhaji Bhide संभाजी भिडेंच्या भाषेत ‘**’च म्हणावे लागेल.

Protected Content