मध्य प्रदेशने राष्ट्रीय एकात्मतेवर हातोडा मारला तेव्हा सगळे चिडीचुप का ? : शिवसेना

मुंबई । प्रत्येक राज्याने भूमिपुत्रांचा विचार करावा. त्यांना रोजगारात प्राधान्य मिळावे हे घटनेनुसारच आहे, पण त्या घटनेनुसार महाराष्ट्राने भूमिपुत्रांचा विचार केल्यावर देशाला राष्ट्रीय एकात्मतेची उचकी लागते. मध्य प्रदेशने त्याच राष्ट्रीय एकात्मतेवर हातोडा मारला, तेव्हा सगळे चिडीचूप कसे आहेत? असा प्रश्‍न आज शिवसेनेने विचारला आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी राज्यातील नोकर्‍यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळावे असा कायदा केला. यावर शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या दैनिक सामना मध्ये भाष्य करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, आता मध्य प्रदेशातील भाजप सरकारनेही भूमिपुत्रांनाच त्यांच्या राज्यात रोजगारात प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. हे प्राधान्य सरकारी नोकर्‍यांत आहे, तसे खासगी क्षेत्रांतही असेल असे दिसते. मध्य प्रदेशातील सर्व नोकर्‍या तेथील भूमिपुत्रांसाठीच हे धोरण शिवराजसिंह चौहान सरकार शत-प्रतिशत राबविणार आहे. म्हणजे महाराष्ट्रात ज्याप्रमाणे ८० टक्के नोकर्‍या भूमिपुत्रांना आणि २० टक्क्यांमध्ये इतर सर्व, तशी वाटणी करायलाही शिवराज सरकार तयार नाही. हे फक्त नोकर्‍यांपुरतेच की राजकारणातसुद्धा राबविले जाणार आहे? असा प्रश्‍न यात विचारण्यात आला आहे.

यात पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा स्थानिकांना रोजगारात प्राधान्य देण्याचा विचार समोर आला, त्या प्रत्येक वेळी एकात्मतेचे सर्वपक्षीय ठेकेदार हे संसदेपासून राज्याराज्यांतील विधानसभेत महाराष्ट्राच्या नावाने ठणाणा करीत उभे राहिले. अशाच प्रकारे खासगी नोकर्‍यांमध्ये ७५ टक्के आरक्षण स्थानिक युवकांना देण्याचा कायदा गेल्या वर्षी आंध्र प्रदेश सरकारनेही केलाच आहे व त्या वेळीही कोणाला राष्ट्रीय एकात्मतेची चिंता वगैरे वाटली नाही. प्रत्येक राज्य हे आपापल्या लोकांची काळजी घेतच असते, पण महाराष्ट्राने ती काळजी घेतली की, देशभरातील सगळ्यांचीच नरडी गरम होतात.

इतरांनी काखा वर केल्या तरी राष्ट्रीय एकात्मतेचे लचांड फक्त महाराष्ट्रालाच सांभाळावे लागेल. कोरोनामुळे देशभरात बेरोजगारीचा स्फोट झाला आहे. १४ कोटी लोकांनी रोजगार गमावला आहे. यामुळे प्रत्येक राज्याने भूमिपुत्रांचा विचार करावा. त्यांना रोजगारात प्राधान्य मिळावे हे घटनेनुसारच आहे, पण त्या घटनेनुसार महाराष्ट्राने भूमिपुत्रांचा विचार केल्यावर देशाला राष्ट्रीय एकात्मतेची उचकी लागते. मध्य प्रदेशने त्याच राष्ट्रीय एकात्मतेवर हातोडा मारला, तेव्हा सगळे चिडीचूप कसे आहेत? हा दुजाभाव शिवरायांच्या महाराष्ट्राला नेहमीच सहन करावा लागला. काही हरकत नाही, चालू द्या हे खेळ! असे या अग्रलेखात सुनावण्यात आले आहे.

Protected Content