मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा – विधानपरिषदेच्या विरोधीपक्ष नेतेपदावर शिवसेनेनं दावा केला आहे. यासाठी ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी अधिकृतरित्या अर्जही दाखल केला आहे. त्यामुळं आता विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीकडे तर विधानपरिषदेचं विरोधीपक्ष नेते पद शिवसेनेकडं जाण्याची शक्यता आहे.
विधीमंडळाचं अधिवेशन पुढील आठवड्यात सुरु होण्याची शक्यता आहे. याआधी विरोधीपक्ष नेतेपदावर शिवसेनेचा दावा दाखल झाला आहे. अरविंद सावंत म्हणाले की, “आज शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेमध्ये विरोधीपक्षनेतेपदावर आमचे आमदार अंबादास दानवे यांना हे पद देण्यात यावं अशी शिफारस उपसभापतींकडे केली आहे. याबाबतचं पत्र मी उपसभापतींना दिलं आहे. त्यामुळं हे पद आम्हालाच मिळेल अशी आशा आहे.”
याबाबत अजित पवार म्हणतात, “खालच्या हाऊसमध्ये अर्थात विधानसभेत सर्वाधिक संख्या राष्ट्रवादीची असल्यामुळं विरोधीपक्ष नेतेपदासाठी आम्ही तसं पत्र दिलं आणि आम्हाला ते पद मिळालं. हा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा असतो त्यांनी मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा केल्यानंतर आम्हाला ते पद मिळालं.
पण विधानपरिषदेत जेवढी काँग्रेसची संख्या तेवढीच राष्ट्रवादीची संख्या आहे. आमच्या दोन्ही पक्षांपेक्षा शिवसेनेची संख्या दोन ने जास्त आहे. आमची संख्या प्रत्येकी १० आहे तर शिवसेनेची संख्या १२ आहे. मागच्या टर्मला आमचे ४१ सदस्य तर काँग्रेसचे ४२ होते. पण आम्हाला तीन जणांचा पाठिंबा होता त्यामुळं आमचे सदस्य ४४ झालं होतं. पण त्यावेळच्या सरकारनं विरोधीपक्षात सर्वात जास्त संख्याबळ ज्यांचं जास्त त्यांना विरोधीपक्ष नेतेपद द्यायचं ठरलं होतं. त्यानुसार, सध्याचा निर्णयही शिवसेनेच्या बाजूनं होऊ शकतो.”