पाचोऱ्यात आंदोलनकर्त्या एस.टी. कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक किटचे वाटप

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एस.टी. कर्मचाऱ्यांचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे’ यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना ‘एक मदतीचा हात’ म्हणून येथील ‘विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’चे संचालक डॉ. भूषण मगर यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंच्या १०० किटचे वाटप करण्यात आले.

‘एस.टी. कर्मचाऱ्यांचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे’ या मागणीसह विविध मागण्यांसाठी राज्यातील बहुतांश आगारातील कर्मचारी गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन करीत आहे. पाचोरा आगारातील चालक, वाहक, यांत्रिक कारागीर यांचेसह सुमारे २०० कर्मचारीही या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाच्या काळात अनेक कर्मचाऱ्यांना मानसिक धक्का बसून आपला जीव देखील गमवावा लागला आहे. आपल्या हक्काच्या मागणीसाठी जीव गमविलेल्या कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली म्हणून या आंदोलनात दुखवटा पाळण्यात येत आहे.

शनिवार, दि. ५ फेब्रुवारी रोजी या आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांना ‘एक मदतीचा हात’ म्हणून येथील डॉ.भूषण मगर यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंच्या १०० किटचे वाटप करण्यात आले. यावेळी नंदू साळुंखे, पाचोरा आगारातील चालक अमृत पाटील, एम.बी.खान, गणेश ठाकरे, आबा कंखरे, वाहक प्रशांत महाले, पूनम राठोड, योगिता पाटील, पुजा गोसावी, ललिता चव्हाण, उद्य पाटील, यांत्रिक कारागिर जाकीर पटवे, जगन्नाथ बोरसे, दिपक पाटीलसह पाचोरा आगारातील आंदोलनकर्ते चालक, वाहक, यांत्रिक कारागिर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आंदोलनकर्ते कर्मचाऱ्यांनी डॉ.भूषण मगर यांचे आभार मानले. उर्वरित आंदोलनकर्त्यांना रविवार दि. ६ फेब्रुवारी रोजी भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्यातर्फे जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात येणार आहे.

Protected Content