मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादावर २९ जूनला सर्वपक्षीय नेत्यांची बैठकीचे आयोजन

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातील ओबीसी आंदोलनाला मोठे यश मिळताना दिसत आहे. मराठा समाजाचा सरसगट ओबीसीमध्ये समावेश करण्याच्या मागणीला ओबीसी समाजाच्या वतीने विरोध करण्यात येत आहे. त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्वा पार्श्वभूमीवर ओबीसी आंदोलनाला शांत करण्यासाठी राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. आजपासून सुरू झालेल्या अधिवेशनादरम्यान 29 जून रोजी ओबीसी समाजाच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी ही सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीतील सर्वच पक्षांच्या भूमिकेकडे आता राज्यातील मराठा आणि ओबीसी समाजाचे लक्ष लागले आहे.

या सर्वपक्षीय बैठकीसाठी सर्व पक्षांच्या प्रमुखांना बोलवण्यात आले आहे. तसेच राज्यातील ओबीसी नेते आणि प्रमुख संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना देखील आमंत्रित करण्यात आले आहे. जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी उपोषण सोडताना आपल्या विविध मागण्या राज्य सरकारच्या शिष्टमंडळासमोर ठेवल्या होत्या. त्या सर्व मागण्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. त्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांचे मत ऐकल्यानंतर राज्य सरकार त्यांची भूमिका जाहीर करणार आहे. त्यामुळे ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. विशेष म्हणजे मराठा आंदोलनादरम्यान देखील अशाच प्रकारची सर्वक्षीय बैठक राज्य सरकारच्या वतीने बोलावण्यात आली होती.

Protected Content