महालक्ष्मी रेसकोर्सवर उद्यान राहणार; बांधकाम होणार नाही

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महालक्ष्मी रेसकोर्स येथील ३०० एकर जागेवर मध्यवर्ती उद्यान विकसित करण्यास राज्य मंत्रिमंडळ बैठकीत बुधवारी मान्यता दिली. मुंबईच्या मध्यवर्ती भागात रेसकोर्सची १२० एकर आणि सागरी किनारा मार्गालगतची १८० एकर जागा वापरून हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान उभारण्यात येणार आहे.

उद्यान उभारणीसाठी रॉयल वेस्टर्न इंडियाकडील (टर्फ क्लब) १२० एकर जागा महापालिकेला हस्तांतरीत होणार आहे. रेसकोर्सची ९१ एकर जागा ३० वर्षे म्हणजे वर्ष २०५३पर्यंत शासकीय भाडेपट्ट्याने टर्फ क्लबकडे राहील. पूर्वी या क्लबकडे रेसकोर्सची सर्व २११ एकर जागा होती. मोकळी जागा अश्व शर्यतीच्या दिवसांव्यतिरिक्त सार्वजनिक वापरासाठी टर्फ क्लबला उपलब्ध राहणार आहे. टर्फ क्लबकडील २०१७ ते २०२३ या कालावधीमधील अतिरिक्त भाडेपट्टीच्या फरकाची रक्कम वसूल न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टर्फ क्लबव्दारे आयोजित करण्यात येणाऱ्या सर्व क्रीडेत्तर कार्यक्रमांसाठी पहिल्या दिवसाला दीड लाख रुपये याप्रमाणे शुल्क आकारण्यास मान्यता देण्यात आली आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी रेसकोर्सच्या जागेत कोणतेही बांधकाम होऊ देणार नाही, असा इशारा दिला असतानाच मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बांधकाम केले जाणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Protected Content