Home Cities अमळनेर अमळनेरात मुंदडा नगर टाकीवर व्हालमनची मनमानी; ११-१२ दिवस उलटूनही जनता तहानलेलीच!

अमळनेरात मुंदडा नगर टाकीवर व्हालमनची मनमानी; ११-१२ दिवस उलटूनही जनता तहानलेलीच!

0
5

अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील मुंदडा नगर क्रमांक १ येथील पाण्याच्या टाकीवरून केला जाणारा पाणी पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला असून, प्रशासकीय यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे आणि लोकप्रतिनिधींच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे सर्वसामान्य जनतेला पाण्यासाठी तीव्र हाल सोसावे लागत आहेत. या भागातील पाणी पुरवठ्याची संपूर्ण सूत्रे आता थेट ‘व्हालमन’ यांच्या हाती गेल्याचे चित्र निर्माण झाले असून, वशिलेबाजी आणि मनमानी पद्धतीने केवळ आपापल्या सोयीच्या भागातच पाणी पुरवठा करण्याचा घाट घातला जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. शहरातील प्रभाग क्रमांक १५, १६, १७ आणि १८ मधील हजारो नागरिकांची तहान भागवणाऱ्या या महत्त्वपूर्ण पाण्याच्या टाकीवरून सध्या आयाराम-गयाराम कारभार सुरू असल्याने अमळनेरकरांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

मुंदडा नगर येथील पाण्याच्या टाकीवरून संबंधित प्रभागांमध्ये सुरळीत आणि समप्रमाणात पाणी पुरवठा व्हावा, या उद्देशाने प्रशासनाने पाच व्हालमन यांची नियुक्ती केली आहे. मात्र, या कर्मचाऱ्यांमध्ये आपसात कसलीही एकवाक्यता आणि समन्वय नसल्यामुळे पाणी वाटपाचे संपूर्ण नियोजन कोलमडले आहे. या मनमानी कारभारामुळे शहरातील काही भागात ६ ते ८ दिवसांनी पाणी मिळते, तर काही दुर्दैवी भागांमध्ये तब्बल ११ ते १२ दिवस उलटूनही पाण्याचा एक थेंबही न मिळाल्याने महिला वर्गाला पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे. हव्या त्या भागात तासनतास पाणी सोडून इतर भागांना कोरडे ठेवण्याचा प्रताप या कर्मचाऱ्यांकडून सुरू असून, उशाशी पाणी आणि घसा कोरडा अशी केविलवाणी परिस्थिती नागरिकांवर ओढवली आहे.

या गंभीर समस्येबाबत वॉर्डातील लोकप्रतिनिधी आणि नगरसेवकांनी पाणी पुरवठा अधिकारी व कर्मचाऱ्यांना वारंवार सूचना दिल्या आहेत, परंतु हे कर्मचारी नगरसेवकांच्या सूचनेलाही केराची टोपली दाखवत असून नागरिकांना थेट उद्धट उत्तरे देत आहेत. जबाबदार अधिकारी आणि लोकप्रतिनिधी प्रत्यक्ष जमिनीवर येऊन काम करण्याऐवजी केवळ सोशल मीडिया पुरतेच मर्यादित राहिले आहेत की काय, असा संतप्त सवाल आता जनता विचारत आहे. गंभीर बाब म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांत १० ते १२ दिवस साठवून ठेवलेले दूषित पाणी पिण्याची वेळ नागरिकांवर आल्यामुळे त्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू असून, संपूर्ण पाणी पुरवठा यंत्रणा कुचकामी आणि जबाबदार अधिकारी सुस्त झाल्याचे चित्र अमळनेरात पाहायला मिळत आहे.

या संदर्भात प्रभाग क्रमांक १६ च्या नगरसेविका नीलिमा विश्वनाथ पाटील यांनी सांगितले की, मुंदडा नगर एक येथील पाण्याच्या टाकीवरील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी नेमलेल्या व्हाल मण यांच्यात अजिबात एक वाक्यता नाही, वारंवार सूचना करूनही ते लोकांना उद्धट उत्तरे देतात; या बेजबाबदार कर्मचाऱ्यांबाबत आपण थेट मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करणार आहोत. दुसरीकडे, नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनी देखील शहरातील पाणी टंचाईच्या तक्रारींना दुजोरा दिला असून, शहरातील सर्वच ठिकाणाहून अनियमित पाणी पुरवठ्याबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत आणि बऱ्याच ठिकाणी पाणी पुरवठा कर्मचारी यांचा मनमानी कारभार दिसून आला असून, अशा कामचुकार कर्मचाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही दिली आहे.


Protected Content

Play sound