जळगावहून काढलेल्या ‘कापूस दिंडी’ प्रमाणेच युवा संघर्ष यात्रा ! : शरद पवार

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आजपासून रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा सुरू झाली असून याच्या शुभारंभाप्रसंगी शरद पवार यांनी १९८० साली काढलेल्या जळगाव ते नागपूर कापूस दिंडीचे स्मरण केले.

विजया दशमीच्या शुभ मुहूर्तावर आमदार रोहित पवार यांनी पुणे ते नागपूर दरम्यान युवा संघर्ष यात्रा काढली आहे. आज पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत याचा शुभारंभ करण्यात आला.ही तब्बल आठशे किलोमीटरची यात्रा असून याच्या दरम्यान रोहित पवार हे या मार्गावर येणार्‍या प्रमुख शहरांमधील नागरिकांशी संवाद साधणार आहेत. यासाठी सुमारे ४५ दिवस लागण्याची शक्यता आहे.

आज रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा सुरू झाली. पुण्यातील टिळक स्मारकाजवळ यात्रा पोहोचली तेव्हा टिळक स्मारक हॉलमध्ये सभेचं आयोजन करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या मनोगतातून रोहित पवार यांचे कौतुक करतांनाच सत्ताधार्‍यांवर जोरदार टिकास्त्र सोडले. याप्रसंगी त्यांनी त्यांच्या पूर्वायुष्यात १९८० साली काढलेल्या जळगाव ते नागपूर या कापूस दिंडीचा आवर्जून उल्लेख केला.

या संदर्भात शरद पवार म्हणाले की, शेतकर्‍यांवर अन्याय होत असतांना सत्ताधारी काहीही करत नव्हते. यामुळे आम्ही जळगावहून हिवाळी अधिवेशनावर पायी दिंडी काढला. या दिंडीला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. आमच्यासाठी गावोगावचे शेतकरी चटणी-भाकरी घेऊन येत होते. अगदी त्याच प्रमाणे रोहित यांची युवा संघर्ष यात्रा असून ती कापूस दिंडीपेक्षा देखील मोठी आहे. आज सरकार शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष करत असून त्यांना निवडणुकीत याचे उत्तर मिळणार असल्याचा इशारा देखील शरद पवार यांनी याप्रसंगी दिला.

Protected Content