उध्दव ठाकरेंची सभा फ्लॉप ! : पालकमंत्र्यांनी केला ‘हा’ दावा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची काल पाचोर्‍यात झालेली सभा ही फ्लॉप असून याला अपेक्षेपेक्षा किती तरी कमी गर्दी असल्याचा दावा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

काल पाचोरा येथे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांची सभा आयोजीत करण्यात आली. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ते पहिल्यांदाच जिल्ह्यात येत असल्यामुळे ही सभा जंगी व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून आले. सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी खुद्द खासदार संजय राऊत आणि संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी जळगावात मुक्काम ठोकला. तर या सभेला विनायक राऊत, अंबादास दानवे आदींसारखे पक्षाचे मोठे नेते देखील आले. ही सभा ऐतीहासीक आणि भव्य-दिव्य व्हावी यासाठी वैशालीताई सूर्यवंशी यांनी सर्वतोपरी साधने उपलब्ध करून दिली. त्यांच्या जोडीला निर्मल परिवार होताच.

या पार्श्‍वभूमिवर, काल रात्री उध्दव ठाकरे यांची सभा पार पडली. या सभेत अपेक्षेनुसार त्यांनी विविध मुद्यांवरून भाष्य केले. त्यांनी ना. गुलाबराव पाटील यांना देखील टार्गेट केले. तर पाचोर्‍यातील पक्षाची आगामी वाटचाल ही वैशालीताई सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील असेल हे देखील त्यांनी स्पष्ट केले. सभा सुरू असतांनाच मैदानाच्या मागील भागात असणार्‍या खुर्च्या खाली दिसून आल्या. या खुर्च्या शेवटपर्यंत भरल्याच नाही. यामुळे ठाकरे यांच्या सभेमुळे त्यांच्या पक्षात चैतन्याचे वातावरण निर्मित झाले असले तरी पाचोरा येथील सभेला अपेक्षेइतके लोक आले नाहीत हे जवळपास स्पष्ट झाले आहे. अनेक वाहिन्यांनी याबाबतचे वृत्तांकन दाखविले आहे.

दरम्यान, सभा संपल्यानंतर प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी देखील सदर सभा ही अयशस्वी झाल्याचा दावा केला आहे. या संदर्भात टिव्ही नाईन या वाहिनीने वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार, पाचोरा येथे उध्दव ठाकरे यांची सभा झालेल्या मैदानाची क्षमता ही २५ हजारांची होती. येथे १८ हजार खुर्च्या टाकण्यात आल्या असून यापैकी फक्त १२ हजार भरलेल्या होत्या असे ना. गुलाबराव पाटील म्हणाले. तसेच एक लाख लोक बसू शकतील असे जळगाव जिल्ह्यात एकही मैदान नसल्याकडे देखील त्यांनी लक्ष वेधून घेतले. यामुळे ठाकरे यांची सभा फ्लॉप झाल्याचा दावा पालकमंत्र्यांनी केला आहे.

तर, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या दाव्याबाबत अद्याप तरी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.

Protected Content