राहुल गांधी यांचा पुन्हा एकदा मोदी-अंबानींवर निशाणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि एरिक्सन इंडिया वादामध्ये आता काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी उडी घेतली आहे. पुलवामा हल्ल्यात देशाचे 40 जवान हुतात्मा झाले, त्या जवानांची 40 कुटुंबे आता जीवनाशी संघर्ष करत आहेत. मात्र त्यांना हुतात्मा दर्जा देखील दिला जात नाही आणि अनिल अंबानी सारख्या माणसांनी समाजासाठी कधीच काही दिले नाही फक्त घेतले आहे. अशा लोकांना मात्र 30 हजार कोटी रुपये ‘गिफ्ट’ दिले जाते, असे ट्विट करत राहुल गांधी यांनी केले आहे.

रिलायन्स कम्युनिकेशन्सचे (आरकॉम) सर्वेसर्वा अनिल अंबानी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. आरकॉम आणि एरिक्सन इंडियाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत अंबानींना येत्या चार आठवड्यात 453 कोटी रुपये भरण्यास सांगितले आहे. अन्यथा तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगण्यास तयार राहण्याचे न्यायालयाने सांगितले आहे. याच संदर्भात राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे.  काय आहे संपूर्ण प्रकरण?- एरिक्सन आणि आरकॉम या दोन कंपन्या 2014 पासून भारतात टेलिकॉम सर्व्हिस क्षेत्रात कार्यरत होत्या. एरिक्सन कंपनी आरकॉमचे भारतातील टेलिकॉम नेटवर्कचे व्यवस्थापन करण्याचे काम करत होती. या संदर्भाचा करार या दोन कंपन्यांमध्ये झाला होता. मात्र, रिलायन्स जिओच्या आगमनानंतर भारतातील सर्वच टेलिकॉम कंपन्यांना फटका बसला आणि त्यांचा व्यवसाय अडचणीत आला. यामध्ये आरकॉमचा देखील समावेश होता. परिणामी कंपनीवर कर्जाचा मोठा डोंगर तयार झाला असून कंपनीला एरिक्सनचे पैसे देणे देखील शक्य होत नव्हते. हे प्रकरण एनसीएलटीकडे गेल्यानंतर आरकॉम दिवाळखोरीत निघण्याच्या मार्गावर होती. मात्र अनिल अंबानी यांच्या कोर्टाच्या मध्यस्थीने एरिक्सनचे पैसे परतफेड करण्याचे मान्य केले होते. मात्र, या करारापोटीचे 550 कोटी रुपये आरकॉमने एरिक्सनला अजून दिले नाहीत. आरकॉम आपली मालमत्ता रिलायन्स जिओला विकून तब्बल 40 देणीदारांचे पैसे फेडणार होती, मात्र रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसार सर्व देणीदारांच्या सहमतीशिवाय मालमत्ता विकता येत नाही. कंपनीने प्रयत्न करूनही देणीदारांकडून सहमती न मिळाल्याने कंपनीला दिवाळखोरीची प्रक्रिया अवलंबावी लागत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Add Comment

Protected Content