निलेश राणेंचा राजकारणाला राम राम ! : सोशल मीडियातून घोषणा

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | माजी खासदार तथा भाजप नेते निलेश राणे यांनी आपण सक्रीय राजकारणापासून दूर होत असल्याची पोस्ट सोशल मीडियात शेअर केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे हे राजकारणातील मोठे प्रस्थ असून त्यांचे दोन्ही पुत्र राजकारणात आहेत. यापैकी नितेश राणे हे विद्यमान आमदार असून निलेश राणे हे माजी खासदार आहेत. भारतीय जनता पक्षातील वजनदार नेते म्हणून राणे कुटुंबाची ख्याती आहे. या पार्श्‍वभूमिवर, दसर्‍याच्या शुभ मुहूर्तावर माजी खासदार निलेश राणे यांनी सोशल मीडियात व्हायरल केलेली पोस्ट चर्चेचा विषय बनली आहे.

या पोस्टमध्ये निलेश राणे यांनी नमूद केले आहे की, मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही, मागच्या १९ ते २० वर्षांमध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्यासोबत राहिलात त्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये खूप प्रेम मिळालं. भाजपासारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी खूप नशीबवान आहे, असे निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.

निलेश राणेंच्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. यामुळे राणे कुटुंबात अंतर्गत कलह तर नव्हे ना ? अशी देखील चर्चा सुरू झाली आहे.

Protected Content