‘मसाका’ला भाडेतत्वावर देण्याची शक्यता

madhukar sahkari sakhar karkhana

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । जिल्ह्यात सहकारी तत्वावर सुरू असणारा एकमेव साखर कारखाना म्हणून ख्यात असणारा ‘मसाका’ अखेर भाड्याने देण्याचा निर्णय घेण्यात आला असून याची चाचपणी सुरू करण्यात आली आहे.

ऊस उत्पादक, कामगार, मजूर यांची देणी तसेच कारखान्यासमोर असलेल्या आर्थिक अडचणी यातून मार्ग काढण्यासाठी तसेच कारखाना अखंडपणे सुरू राहावा याकरिता तो भाडेतत्त्वावर देण्याच्या चर्चेसाठी सोमवारी मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची महत्त्वपूर्ण सभा चेअरमन शरद महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी सर्वसाधारण सभेची मंजुरी व त्यानंतर योग्य प्रस्ताव आल्यास मधुकर भाडेतत्वावर देण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला.

मधुकर सहकारी साखर कारखाना सद्य:स्थितीत प्रतिकूल परिस्थितीतून मार्गाक्रमण करीत आहे. त्यात सन २०१८/१९ मधील ऊस उत्पादक शेतकर्‍यांची एफआरपीची रक्कम, कामगारांचे वेतन, ऊसतोडणी वाहतूकदार यांचे पेमेंट आर्थिक अडचणींमुळे अदा करता आलेले नाही. त्यात सन २०१९/२० साठी एक हजार हेक्टर उसाची उपलब्धता कारखाना कार्यक्षेत्रात आहे. त्यात मागील देणी बाकी असल्याने तसेच हंगाम सुरू करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे आर्थिक सहाय्य नसल्याने गाळप हंगाम सुरू करणे कठीण आहे. या सर्व बाबींचा विचारविनिमय या बैठकीत करण्यात आला.

तसेच गाळप हंगाम २०१९/२० सुरू न झाल्यास नोंदणी केलेल्या ऊस उत्पादकांचे, कामगारांचे, तोडणी वाहतूक, ठेकेदार तसेच सर्व संबंधित घटक यांचे फार मोठे नुकसान होऊ शकते. यासाठी साखर आयुक्तांनी काढलेल्या परिपत्रकाच्या निर्देशानुसार कारखाना भाडेतत्त्वावर, सहयोग तत्वावर अथवा भागीदारी तत्वावर देणे बाबतची चर्चा या सभेत करण्यात आली. यावेळी सभेत कारखाना भाडेतत्त्वावर द्यायचा असल्यास सर्वप्रथम कारखान्याशी संबंधित सर्व लोकप्रतिनिधींची व महत्त्वाच्या पदाधिकार्‍यांची चर्चा करण्यात येईल. त्यानंतर सर्वसाधारण सभेची मंजुरी घेऊन कारखाना चालवण्यासाठी योग्य प्रस्ताव आल्यास त्याचा विचार करण्यात येईल, असाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला. मधुकर सहकारी साखर कारखाना गेल्या ४० वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून मधुकरला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी व मधुकर यापुढे अखंड सुरू राहावा यासाठी भाडेतत्त्वावर देण्यात यावा या विषयासह अन्ययही विषयांवर गंभीरपणे चर्चा झाली. संचालक मंडळाच्या या सभेला व्हाईस चेअरमन भागवत पाटील, कार्यकारी संचालक एस.आर.पिसाळ व सर्व संचालक उपस्थित होते

या संदर्भात कारखान्याचे चेअरमन शरद महाजन म्हणाले की, ‘मधुकर’ अखंडपणे सुरू राहावा ही सर्व संचालक मंडळाची मनापासूनची इच्छा आहे. मात्र सध्या कारखान्याला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सर्वांचीच देणी थकलेली आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी बैठकीत चर्चा झाली. भाडे तत्त्वाचा योग्य प्रस्ताव आल्यास, लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून सर्वसाधारण सभेची मंजुरी घेऊन त्या प्रस्तावावर विचारविनिमय करण्यात येईल.

वास्तविक पाहता, कारखान्याच्या संचालक मंडळाला याला चालवण्यासाठी इच्छाशक्ती आहे. तथापि, यावर्षी परिसरात उसाचा पेरा कमी प्रमाणात झाल्याचा फटकादेखील बसल्याचे दिसून येत आहे.

Protected Content