रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर शहरातील बऱ्हाणपूर रोडवरील एका गोडाऊनमधून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना रावेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रावेर शहरातील बऱ्हाणपूर रोडवरील नारायणी सेल्स गोडाऊनमध्ये २४ ते २६ मे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी शटरचा कडीकोंडा तोडून अनधिकृत प्रवेश केला. गोडाऊनमध्ये प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी तेथे ठेवलेले कॅडबरी बॉक्स, ५ स्टार चॉकलेट बॉक्स, एक मोबाईल आणि डीव्हीआर (DVR) वायफाय आऊट असा एकूण ४८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
या घटनेप्रकरणी गोडाऊनचे मालक उज्वल ओमप्रकाश अग्रवाल यांनी रावेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक मीरा देशमुख करत आहेत. शहरात अशा प्रकारच्या चोरीच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.