भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील सिद्धी कॉलनी परिसरात एका किरकोळ कारणावरून झालेल्या वादाने हिंसक रूप धारण केले असून, एका दुकानदारावर लोखंडी पाईपने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, व्यापारी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अजय कन्हैयालाल माखिजा (वय ४५, रा. सिद्धी कॉलनी, भुसावळ) हे २७ एप्रिल रोजी सायंकाळी ७:३०च्या सुमारास आपल्या दुकानात उपस्थित होते. यावेळी थनसिंग मेहरे आणि मोहित थनसिंग मेहरे हे दोघे दुकानात आले. त्यांनी फिर्यादी माखिजा यांना “तू मला फाटक्या नोट दिलीस” असे म्हणत वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपी थनसिंग मेहरे याने माखिजा यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर लोखंडी पाईपने जोरदार वार केला. माखिजा यांनी वेळीच बचाव केल्यामुळे पाईप त्यांच्या डोक्याला लागला, ज्यात त्यांना दुखापत झाली.

केवळ एवढ्यावरच न थांबता, या दोघांसोबत आलेल्या इतर ७ ते ८ अज्ञात व्यक्तींनी मिळून माखिजा यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. जखमी माखिजा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक जयेंद्र पसारे अधिक तपास करत आहे.



