जळगाव/पारोळा- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पारोळा येथील कुटीर रुग्णालयात कार्यरत असलेल्या सहाय्यक अधीक्षकाला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. स्थायी आदेश (Permanent Appointment Order) देण्यासाठी ३ हजार रुपयांची मागणी करून, तडजोडीअंती २ हजार रुपये स्वीकारताना संबंधित अधिकाऱ्याला एसीबीने पकडले. या कारवाईमुळे आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार हे पारोळा येथील कुटीर रुग्णालयात अनुकंपा तत्त्वावर सफाई कामगार म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदाराने त्यांना ‘स्थायी आदेश’ मिळावा, यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे १३ एप्रिल २०२६ रोजी अर्ज केला होता. याच संदर्भात २४ एप्रिल रोजी तक्रारदार हे कुटीर रुग्णालयातील सहाय्यक अधीक्षक विजय प्रकाश वाघ यांना भेटले असता, वाघ यांनी स्थायी आदेश तयार करून देण्याच्या मोबदल्यात ३ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र, तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारे २८ एप्रिल २०२६ रोजी एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता, आरोपी विजय वाघ याने ३ हजार रुपयांची मागणी करून तडजोडीअंती २ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.

एसीबीच्या पथकाने यानुसार सापळा रचला आणि ठरल्याप्रमाणे २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना आरोपी विजय वाघ याला रंगेहात पकडले. यावेळी आरोपीची अंगझडती घेतली असता ३३० रुपये रोख आणि एक ‘व्हिवो’ कंपनीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर (पर्यवेक्षण व सापळा अधिकारी), पोलीस निरीक्षक हेमंत नागरे (तपास अधिकारी) आणि सापळा पथकातील जीपीएसआय सुरेश पाटील, पोलीस नाईक सुनील वानखेडे व पोलीस कॉन्स्टेबल बाळू मराठे यांनी मोलाची भूमिका बजावली. याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.



