Home Cities जळगाव जळगावकरांना भुरळ घालणारा ‘भुताचा वाडा’ ; देखाव्यासाठी दीड किलोमीटरपर्यंत रांगा

जळगावकरांना भुरळ घालणारा ‘भुताचा वाडा’ ; देखाव्यासाठी दीड किलोमीटरपर्यंत रांगा

0
1

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सर्वोत्तम एकता मित्र मंडळाने सर्वोत्तम नगर येथील कला भवनसमोर, सिंधी कॉलनी रोडवर यंदा ‘भुताचा वाडा’ हा अनोखा आणि थरारक देखावा सादर केला आहे. या देखाव्याने जळगावकरांचे लक्ष वेधून घेतले असून, तो पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. देखाव्याचा थरार अनुभवण्यासाठी सुमारे एक ते दीड किलोमीटरपर्यंत रांगा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

‘भुताचा वाडा’ या देखाव्याच्या माध्यमातून मंडळाने नागरिकांना भीती आणि उत्सुकतेचा अनोखा अनुभव देण्याचा प्रयत्न केला आहे. वाड्यात प्रवेश करताना समोर येणारे थरारक प्रसंग आणि वातावरणामुळे अनेकजण घाबरून जातात. विशेषतः लहान मुले आणि महिलांच्या चेहऱ्यावर सुरुवातीला भीती स्पष्टपणे दिसून येते. मात्र, संपूर्ण देखावा पाहून बाहेर आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि हा अनुभव घेतल्याचा आनंद दिसून येतो.

या अनोख्या देखाव्याची चर्चा परिसरात मोठ्या प्रमाणात होत असून, मित्रपरिवार आणि कुटुंबीयांसह नागरिक येथे भेट देत आहेत. देखावा पाहण्यासाठी लागणाऱ्या लांबच लांब रांगा हे या उपक्रमाला मिळणाऱ्या प्रतिसादाचे चित्र आहे. थरारक अनुभवासोबतच नागरिकांना काहीतरी वेगळे पाहण्याची संधी मिळत असल्याने या देखाव्याबद्दल उत्सुकता वाढत आहे. या उपक्रमामागील संकल्पना, देखाव्याची उभारणी आणि नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद याबाबत सर्वोत्तम एकता मित्र मंडळाचे अध्यक्ष गौरव शिरसाळे आणि माजी नगरसेवक चेतन शिरसाळे यांच्याशी संवाद साधण्यात आला. मंडळाने सादर केलेल्या या अनोख्या देखाव्यामुळे जळगावच्या सार्वजनिक उत्सवी वातावरणात थराराची भर पडली आहे.


Protected Content

Play sound