धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरात राहणाऱ्या गिरीष सुकदेव माळी (वय ३५, रा. रामलीला चौक, धरणगाव) या तरुणाने आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवार २७ मे दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे माळी कुटुंबावर आणि परिसरात शोककळा पसरली आहे. धरणगाव पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत गिरीष माळी हा त्याची पत्नी कविताबाई, आई आशाबाई, वडील सुकदेव दयाराम माळी आणि दोन मुले (मयुरेश १२, कार्तिकी ९) यांच्यासह राहत होता. तो आणि त्याचा मोठा भाऊ स्वप्नील माळी हे दोघेही वडिलांच्या नावावरील धरणगाव शिवारातील शेतीत एकत्र काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.
आज मंगळवारी २७ मे रोजी सकाळी ११ वाजता गिरीष आणि त्याचा भाऊ स्वप्नील हे धरणगाव शिवारातील गट नंबर ६६ मधील पाटाजवळील शेतात भेंडी तोडायला गेले होते. दुपारी १ वाजताच्या सुमारास भेंडी तोडत असताना गिरीषने स्वप्नीलला ‘मी पाणी पिऊन येतो’ असे सांगितले आणि तो विहिरीकडे गेला. बराच वेळ झाला तरी गिरीष परत न आल्याने स्वप्नीलने विहिरीकडे जाऊन पाहिले असता, गिरीष विहिरीजवळ असलेल्या झाडाच्या फांदीला दोर बांधून गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेला दिसला. भावाला लटकलेला पाहताच स्वप्निलने एक आक्रोश केला. त्यानंतर शेजारील शेतकरी कडू रुपा महाजन आणि गिरधर संखाराम महाजन यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्वप्नीलने चुलत भाऊ विजय धनराज महाजन यांनाही फोन करून बोलावले. सर्वांनी मिळून गिरीषला खाली उतरवले आणि तात्काळ खासगी ॲम्बुलन्स बोलावून धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गिरीषला मृत घोषित केले. या घटनेमुळे माळी कुटुंबाला मोठा धक्का बसला असून, त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.