जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी नगरातील क्रांती चौकात एका मोटरसायकल अपघातात एक मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी २७ मे रोजी दुपारी २ वाजता घडली. या अपघातानंतर येथील सामाजिक कार्यकर्ते विजय बांदल यांच्यासह परिसरात नागरीकांना रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी शहर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून वाहतूकीचा रस्ता मोकळा केला आणि आंदोलनकर्ते यांना रस्त्याच्याबाजूला करून समजवून सांगितले. मात्र जोपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी येणार नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा पवित्रा बांदल यांनी घेतला.
यानंतर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट देत, या ठिकाणी गतिरोधक बसवण्याची मागणी मान्य केली. अधिकाऱ्यांनी गतिरोधकाचे आश्वासन दिल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले. जखमी मुलावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. या आंदोलनामुळे क्रांती चौकातील अपघातांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.