Home क्राईम डी-मार्ट परिसरात संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ ; घातपातचा आरोप

डी-मार्ट परिसरात संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ ; घातपातचा आरोप


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील डी-मार्ट परिसरामध्ये एका ३६ वर्षीय तरुणाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. श्रीकांत रमेश कोळी (वय ३६, मूळ रा. तांदलवाडी, ता. रावेर, ह.मु. जळगाव) असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, हा अकस्मात मृत्यू नसून घातपात असल्याचा गंभीर आरोप मयताच्या वडिलांनी केला आहे. या घटनेमुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली होती.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मयत श्रीकांत कोळी हा गेल्या तीन महिन्यांपासून एका तरुणीसोबत जळगावातील शिवकॉलनी परिसरात लिव्ह-इन मध्ये राहत होता. सोमवार, २५ मे रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह डी-मार्ट परिसरात आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच श्रीकांतचे वडील रमेश कोळी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी श्रीकांतला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.

या घटनेला आता वेगळे वळण मिळाले आहे. मयताचे वडील रमेश कोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात श्रीकांतचे त्याच्यासोबत राहणाऱ्या तरुणीशी कडाक्याचे भांडण झाले होते. त्या भांडणानंतर संबंधित तरुणीने नाशिक येथील एका तरुणाला जळगावात बोलावून घेतले होते. त्या दोघांनी मिळून श्रीकांतला बेदम मारहाण केली होती आणि जीवे मारण्याची धमकीही दिली होती, असा आरोप वडिलांनी केला आहे.

या प्रकरणी मयताच्या वडिलांनी घातपाताचा संशय व्यक्त करत दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. सध्या या संदर्भात रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. पोस्‍टमॉर्टमच्या अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल.


Protected Content

Play sound