Home Cities अमळनेर डिझेल टंचाईचा संताप अनावर; अमळनेरात शेतकऱ्यांनी वाळू वाहतूक करणारे डंपर अडवले

डिझेल टंचाईचा संताप अनावर; अमळनेरात शेतकऱ्यांनी वाळू वाहतूक करणारे डंपर अडवले


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्यात सुरू असलेल्या डिझेल व पेट्रोल टंचाईचा मोठा फटका सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी वर्गाला बसत असताना अमळनेरमध्ये मात्र वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरांना सहज डिझेल उपलब्ध होत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले. डिझेलअभावी शेतीपूर्व मशागतीची कामे ठप्प झाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत वाळू वाहतूक करणारी अवजड वाहने अडवून प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला.

अमळनेर तालुक्यात सध्या अनेक पेट्रोल पंपांवर डिझेलचा तुटवडा जाणवत असून शेतकऱ्यांना तासन्तास रांगेत उभे राहूनही डिझेल मिळत नसल्याची परिस्थिती आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर शेती मशागतीची कामे रखडल्याने शेतकरी आर्थिक आणि मानसिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरांना कोणत्याही अडथळ्याशिवाय सतत डिझेल पुरवठा होत असल्याचे चित्र समोर आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

या पार्श्वभूमीवर माजी सभापती शाम अहिरे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य शेतकरी आक्रमक झाले. त्यांनी रात्रीच्या वेळी वाळू वाहतूक करणारे डंपर थांबवत प्रशासनाला जाब विचारला. “शेतकऱ्यांना डिझेल नाही म्हणून शेतीची कामे थांबली आहेत, मग वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरांना नंबर न लावता सहज डिझेल कसे मिळते?” असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला.

शेतकऱ्यांनी प्रशासनावर दुहेरी निकष लावल्याचा आरोप करत तातडीने डिझेल पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला. या घटनेमुळे अमळनेर परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

 


Protected Content

Play sound