युरियासोबत खताची लिंकींग नकोच ! : विक्रेत्यांची ठाम भूमिका

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | युरियासोबत खतांची लिंकींग करण्याची अनेक कंपन्या सक्ती करत असून असे झाल्यास संबंधीत कंपनीच्या युरियावर बहिष्कार टाकण्याची ठाम भूमिका रावेर ॲग्रो डीलर्स असोसिएशनने घेतली आहे.

रावेर ॲग्रो डीलर्स असोसिएशनची बैठक काल पार पडली. यात यंदा होऊ घातलेल्या खरीप हंगामाबाबत तसेच युरियासोबत येणार्‍या इतर अतिरिक्त खतांच्या लिंकिंग बाबत महत्वाची चर्चा झाली. त्यात यापुढे युरियासोबत इतर खते,कीटकनाशके,महागडी विद्राव्य खते जबरदस्ती लिंकिंग केल्यास रावेर तालुक्यातील कोणताही खत विक्रेता युरिया घेणार नाही असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. तसेच लिंकिंगबाबत खास निर्णय घेण्याबाबतचे आवाहन एका निवेदनाद्वारे जळगाव जिल्हा ॲग्रो डीलर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष तथा माफदा अध्यक्ष विनोद तराळ यांना रावेर संघटनेतर्फे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे यांनी दिले.

गेल्या महिनाभरात रावेर तालुक्यात गारपीट, वादळी वारे,बेमोसमी पाऊस अशा नैसर्गिक आपत्तींनी व केळीच्या कमी झालेल्या बाजारभावाने त्रस्त आहेत. त्यातच रासायनिक खत कंपन्या युरियासोबत मोठ्या प्रमाणावर लिंकिंग देत असल्याने तालुक्यातील खत विक्रेत्यांना शेतकर्‍यांच्या रोषाला सामोरे जावे लागते. तर युरियासोबत लिंकिंग न घेतल्यास खत मिळत नाही. त्यामुळे दोन्ही बाजूंनी खतविक्रेत्यांची कोंडी होत असून त्यापेक्षा अशा युरियाला खरेदी न करता त्या रॅकवर आम्ही बहिष्कार टाकू अशी माहिती रावेर ऍग्रो डीलर्स असोसिएशनचे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे यांनी दिली.

दरम्यान, लिंकिंगचा त्रास असाच सुरू राहिल्यास पूर्ण रावेर तालुक्यातील खत विक्रेते आपले पॉस मशीन कृषी विभागाकडे परत देतील अशी माहिती ही निवेदनात देण्यात आली आहे.या बैठकीस रावेर ॲग्रो डीलर्स असोसिएशनचे तालुकाध्यक्ष सुनिल कोंडे, उपाध्यक्ष एकनाथ महाजन,सचिव युवराज महाजन,ज्येष्ठ उद्योजक चंद्रकांत अग्रवाल, सुनिल कुलकर्णी,डॉ जी एम बोंडे,जितेंद्र महाजन,प्रविण पाटील,जितेंद्र महाजन,रवींद्र बारी,अमोल लोखंडे,प्रदीप महाजन,गणेश महाजन,नंदू पाटील,जितेंद्र पाटील,राहुल शिंदे,यादवेंद्र माळी, वैभव चौधरी,विशाल पाटील,नितीन पाटील,धीरज पाटील यांसह अन्य विक्रेते उपस्थित होते.

Protected Content