पालकमंत्र्यांची बदनामी केल्याच्या निषेधार्थ धरणगावात रास्ता रोको आंदोलन

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिंदे गटाचे मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना शिवीगाळ केल्याची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी दुपारी धरणगाव शहरातील रेल्वे उड्डाणपुलावर शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केल्याचे पहायला मिळाले.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, सोशल मीडियावर एका रमेश पाटील नावाच्या व्यक्तीने शिंदे गटाचे मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना फोन केला. यात रमेश पाटील यांनी थेट राजीनामा देण्याची मागणी करत शिवीगाळ केली. त्याच रमेश पाटील नावाच्या व्यक्तीने सोशल मीडियावर शिवीगाळ केल्याची क्लिप व्हायरल केली. दरम्यान, धरणगाव शहराचे माजी नगरसेवक भागवत चौधरी यांनी हीच क्लिप मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदार संघासह इतर ठिकाणी व्हायरल करत असल्याचे दिसून आले. दरम्यान, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची बदनामी होत असल्याच्या निषेधार्थ धरणगाव शहरातील शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मंगळवारी ५ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता रेल्वे उड्डाणपुल येथे रास्ता रोको आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. संबंधित शिवीगाळ करणारा रमेश पाटील नामक व्यक्ती आणि धरणगावचे माजी नगरसेवक भागवत चौधरी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. याप्रसंगी शिंदे गटाचे शहर प्रमुख विलास महाजन, वासूदेव चौधरी, धिरेंद्र पुरभे, भैय्याभाऊ महाजन, योगेश वाघ, बालू जाधव, मोती पवार, रविंद्र कंखरे  यांच्यासह आदी उपस्थित होते.

Protected Content