….आणि एकट्या तरूणीसाठी धावली राजधानी एक्सप्रेस !

रांची वृत्तसंस्था । एकट्या प्रवाशाच्या मागणीवरून राजधानी एक्सप्रेस धावू शकेल यावर कुणाचा विश्‍वास बसणार नाही. मात्र हा प्रकार काल रात्री घडला असून अनन्या या फक्त एका तरूणीला घेऊन ५३५ किलोमीटरचा प्रवास करावा लागला. रेल्वेच्या इतिहासात हा प्रकार अतिशय दुर्मिळ मानला जात आहे.

वाचा नेमक्या कोणत्या कारणासाठी हा प्रवास घडला ते ?

झारखंडमध्ये सध्या ताना भगत या आदिवासी जमातीचे तीव्र आंदोलन सुरू आहे. या समुदायातील शेकडो लोकांनी रेल्वे ट्रॅकवर येऊन आंदोलन केल्याने रेल्वे प्रशासनाने अनेक गाड्या रद्द केल्या. लातीहार जिल्ह्यातील टोरी जंक्शन परिसरात आंदोलकांनी रेल्वे रूळांवर ठाण मांडल्याने जवळपास ७० प्रवासी आणि मालगाड्यांना विलंब झाला. दोन्ही बाजूंनी गाड्यांना दूरच्या स्थानकांवर थांबविण्यात आले.

दरम्यान, रांची येथे जाणारी राजधानी एक्सप्रेस ही डाल्टनगंज रेल्वे स्थानकात थांबविण्यात आली होती. अनेक तास उलटले तरी रेल्वे मार्ग मोकळा न झाल्यामुळे रेल्वे प्रशासनाने बसची व्यवस्था करून राजधानी एक्सप्रेसमधील प्रवाशांना रांची येथे रस्त्याच्या मार्गाने रवाना केले. ट्रेनमधील ९३० पैकी ९२९ प्रवाशांनी या मार्गाने घरी जाण्याला होकार दिला. तथापि, रांची येथील रहिवासी असणार्‍या अनन्या या तरूणीने मात्र याला साफ नकार दिला. मला बस वा चारचाकीने जायचे असते तर राजधानी एक्सप्रेसची तिकिट काढलेच नसते असे ती म्हणाली. कितीही वेळ लागला तरी मी राजधानी एक्सप्रेसनेच रांची येथे जाईल असा हट्ट तिने धरला. अखेर तिच्या या मागणीपुढे रेल्वे प्रशासन झुकले.

काल सायंकाळी राजधानी एक्सप्रेस ही गाडी गोमो आणि बोकारो या मार्गाने रांची येथे पाठविण्यात आली. खरं तर डाल्टनगंज ते रांची हे ३०८ किलोमीटरचे अंतर असले तरी फेर्‍याने गाडी गेल्याने तब्बल ५३५ किलामीटरचे अंतर कापून रात्री पावणे दोन वाजता ही ट्रेन रांची स्टेशनला पोहचली. आणि यात अनन्या ही एकमेव प्रवासी असून तिच्या सुरक्षेसाठी काही महिला आरपीएफ कर्मचार्‍यांना जावे लागले. याबाबत अनन्या ही प्रसारमाध्यमांशी बोलतांना म्हणाली की, प्रवासी म्हणून मी माझ्या हक्क मिळवला आहे. ती मूळची रांची येथील रहिवासी असली तरी वाराणसी येथील बनारस हिंदू युनिव्हर्सीटीमध्ये कायद्याचे शिक्षण घेत आहे.

दरम्यान, फक्त एका प्रवाशासाठी राजधानी एक्सप्रेस सारख्या सुपर एक्सप्रेस गाडीला तब्बल पाचशे पेक्षा जास्त किलोमीटरचा प्रवास करावा लागल्याचे हे उदाहरण अतिशय दुर्मिळ मानले जात आहे.

Protected Content